जिनिव्हा : भारतासह जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. सर्वच देशांकडून या महामारीला रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर भारतामध्ये सरकारकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचं कौतुक जगभरात होत आहे. अशातच भारताने कोरोनाच्या संकटाशी लढत असताना जगातील अनेक देशांना मदत देखील केली आहे.

कोरोनाविरोधातील भारताच्या लढाईचं कौतुक होत असताना स्वित्झर्लंडने देखील भारताला अनोखा सलाम केला आहे. प्रसिध्द आल्प्स पर्वतरांगेतील मॅटरहॉर्न पर्वतावर भारतीय तिरंगा झळकवत सलाम केला आहे. भारतीय तिरंगा मॅटरहॉर्न पर्वतावर लाईट्सच्या मदतीने झळकवला आहे. यामधून कोरोनाविरोधाती भारताची लढाई आणि जिंकण्याच्या प्रयत्नांना सलाम केला आहे.


सुमारे 1200 किलोमीटर पसरलेल्या आल्प्स पर्वतरांगेला युरोपात अनन्यसाधारण महत्व आहे. युरोपातील अनेक देशांतील नैसर्गिक सौंदर्यातलं एक महत्वाचं नाव म्हणजे ही पर्वतरांग. आपल्याकडे जसं हिमालयाचं महत्व आहे तसंच युरोपात आल्प्सचं महत्व आहे. मॅटरहॉर्न हे 14690 फूट उंचीचं आल्प्समधील 6 व्या क्रमांकाचं गिरीशिखर आहे.



याच मॅटरहॉर्नवर स्वित्झर्लंडमधील लाईट आर्टिस्ट गेरी हॉफस्टेटर यांनी तिरंगा झळकवला आहे. याबाबत माहिती देताना भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी गुरलीन कौर यांनी याचे फोटो शेअर केले आहेत. आपल्या ट्विटरवरुन शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, 'जवळपास 800 मीटर उंचीवर तिरंगा. हिमालयासोबत आल्प्सची मैत्री, धन्यवाद!'

माहितीनुसार या पर्वतावर मागील 24 मार्चपासून कोरोना महामारीविरोधात जगातील देशांची एकजूट दर्शवण्यासाठी विविध देशांचे झेंडे झळकवण्यात आले आहेत.

Coronavirus | हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनच्या पुरवठ्यानंतर ट्रम्प यांचा सूर बदलला; पंतप्रधान मोदींचे आभार मानले!

स्वित्झर्लंडमध्ये  COVID-19 ने आतापर्यंत 18,000 लोकांना बाधा झाली आहे. यामुळे 430 लोकांचा मृत्यू झाला आहे. जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात 1,54,126 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या 22 लाखांवर पोहोचली आहे. जगभरात कोरोना बाधितांचा आकडा 2,248,330 आहे. मागील काही दिवसांपासून अमेरिकेमध्ये कोरोनामुळे मृत्यू तांडव सुरू आहे. जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा सर्वाधिक अमेरिकेमध्ये आहे.

भारताकडून अनेक देशांना मदत

भारतातील औषध कंपन्या मोठ्या प्रमाणात हाइड्रॉक्सिक्लोरोक्वीनचं उत्पादन करतात. आता हे औषध कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी परिणामकारक ठरत आहे. त्यामुळे याची मागणी वाढत आहे. भारताने अमेरिकेसह अनेक देशांना या औषधाचा पुरवठा केला आहे. याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचे आभार देखील मानले होते.