Lotus : कमळाच्या नव्या प्रजातीचा शोध; मंत्री जितेंद्र सिंहांकडून “नमो 108” कमळाचं अनावरण
India: केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते कमळाच्या नव्या प्रजातीचं अनावरण करण्यात आलं आहे. या कमळाला “नमो 108” असं नाव देण्यात आलं आहे. या कमळाला 108 पाकळ्या आहेत.
नवी दिल्ली: केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह (Jitendra Singh) यांनी शनिवारी (19 ऑगस्ट) लखनौमध्ये कमळाच्या नवीन प्रजातीच्या कमळाच्या (Lotus) फुलाचं अनावरण केलं आहे. त्यांनी या फुलाला “नमो 108” असं नाव दिलं आहे. या अनोख्या कमळाला 108 पाकळ्या आहेत आणि ते उत्तर प्रदेशातील लखनौमधील वनस्पती-आधारित संशोधन केंद्र, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR)-नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (NBRI) ने विकसित केलं आहे.
विशेष गुणधर्माला अनुसरुन देण्यात आलं नाव
कमळाच्या फुलाच्या अनावरण कार्यक्रमातील फोटो डॉ. जितेंद्र सिंह यांनी ट्विटरवर शेअर केले आहेत. ज्यात त्यांनी लिहीलं आहे की, "कमळ हे भारताचं राष्ट्रीय फूल आहे आणि आमच्यासाठी विश्वासाचं प्रतीक आहे. नवीन प्रकारातील कमळाचं फूल ‘नमोह 108’चं अनावरण करताना अभिमान वाटतो. त्यातील विशिष्ट गुणधर्माला अनुसरुन फुलाला नाव देण्यात आलं आहे. नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट लखनौ द्वारे हे कमळ विकसित करण्यात आलं आहे."
कमळापासून बनवलेला परफ्युम आणि कपड्यांचंही सादरीकरण
कार्यक्रमादरम्यान, केंद्रीय मंत्र्यांनी कमळाच्या फायबरपासून बनवलेले कपडे आणि कमळाच्या फुलांपासून तयार केलेला 'फ्रोटस' नावाचा परफ्यूम देखील यावेळी सादर केला. परफ्यूम आणि कपडे NBRIने (National Botanical Research Institute) FFDC, कन्नौजच्या सहकार्याने लोटस रिसर्च प्रोग्रामचा एक भाग म्हणून विकसित केले आहेत, असं मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीत सांगण्यात आलं आहे.
मोदींच्या कार्यकाळाच्या दहाव्या वर्षातील पदार्पणानिमित्त भेट
जितेंद्र सिंह यांनी या अनोख्या कमळ जातीला “नमोह 108” असं नाव दिल्याबद्दल NBRIचं कौतुक केलं आहे. ते म्हणाले, "नरेंद्र मोदी यांचं अथक कार्य आणि परिश्रमाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी ही सुंदर सुगंधी भेट आहे. पंतप्रधान म्हणून त्यांच्या कार्यकाळाच्या दहाव्या वर्षात येताना त्यांच्यासाठी ही खास भेट आहे"
कृषी अर्थव्यवस्थेला चालना देणारे प्रकल्प
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने #AromaMission, Tulip Project, Namoh #Lotus 108 सारखे विविध पुष्प प्रकल्प यशस्वीरित्या सुरू केले आहेत, ज्यामुळे कृषी अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात चालना मिळते," असंही डॉ. जितेंद्र सिंह पुढे म्हणाले.
सीएसआयआर-नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूटने सोमवारी अधिकृतपणे या फुलाची ओळख करून दिली. त्यावेळी CSIR-NBRI चे महासंचालक एन. कलैसेल्वी म्हणाले, "स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी 'नमोह 108' देशासमोर सादर करणे हा आनंददायक योगायोग आहे." नावातील क्रमांकाबद्दल बोलताना कलैसेल्वी म्हणाले की, या फुलाचं धार्मिक महत्त्व आणि ‘108’ क्रमांक लक्षात घेऊन या कमळाच्या जातीला महत्त्वाची ओळख देण्यात आली आहे.