MHA Awards 2022 : यंदा देशातील 151 पोलीस अधिकाऱ्यांना MHA पुरस्कार, 28 महिलांचाही सन्मान
MHA Awards 2022 : यंदा देशभरातील 151 पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री पदकानं सन्मानित करण्यात येणार आहे. पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येतो.
MHA Awards 2022 : स्वातंत्र्यदिनादिवशी देशभरातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री पदकानं (MHA Awards) पुरस्कार देण्यात येतो. यंदाही 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी देशभरातील 151 पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री पदकानं सन्मानित (Union Home Minister’s Medal for Excellence in Investigation) करण्यात येणार आहे. गुन्ह्यांची उकल करण्यात तसेच तपासात चांगली कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा या पुरस्कारानं गौरव करण्यात येतो. यंदा या पुरस्कार मिळणाऱ्यांमध्ये 28 महिला पोलिसांचाही समावेश आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण (CBI) मधील 15 पोलीस अधिकारी आणि महाराष्ट्रातील 11 पोलीस अधिकारी यंदा केंद्रीय गृहमंत्री पदकासाठी मानकरी ठरले आहेत. या व्यतिरिक्त मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील प्रत्येकी दहा पोलीस अधिकाऱ्यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. राष्ट्रीय तपास संस्था (NIA) आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) पाच अधिकाऱ्यांनाही पदकानं सन्मानित करण्यात येणार आहे.
151 पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान
यासह केरळ, राजस्थान आणि पश्चिम बंगालसह इतर राज्यांतीलही पोलीस अधिकाऱ्यांनाही मानाचा MHA पुरस्कार देण्यात येणार आहे. गुन्ह्यांची उकल करताना तपास यंत्रणेला प्रोत्साहन मिळावं आणि तपाय उत्कृष्ट योग्य रितीनं व्हावा यासाठी 2018 मध्ये केंद्रीय गृहमंत्री पदक देण्यास सुरुवात करण्यात आली. तपासात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा हे पदकं देऊन सन्मान करण्यात येतो. दरवर्षी 12 ऑगस्ट रोजी या पुरस्कारांची घोषणा करण्यात येते आणि 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
केंद्रीय गृहमंत्री पदकासाठी पात्र अधिकाऱ्यांच्या शिफारशी या वर्षी फेब्रुवारीमध्ये करण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये हेड कॉन्स्टेबल ते पोलीस अधीक्षकांपर्यंतच्या पदावरील अधिकाऱ्यांचा समावेश होता. निवड प्रक्रियेदरम्यान महिलांना सामील करण्यावर विशेष भर दिला जातो. 2018 मध्ये तपासात उत्कृष्टतेसाठी केंद्रीय गृहमंत्री पदकं देण्यास सुरुवात करण्यात आली. दरवर्षी 12 ऑगस्ट रोजी या पुरस्काराची घोषणा होती.
तपासात उत्कृष्ट सेवेसाठी पुरस्कार
MHA हा पुरस्कार केंद्रीय तपास यंत्रणा, राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या तपासातील उत्कृष्ट सेवेसाठी दिला जातो. त्यासाठी हेडकॉन्स्टेबलपासून ते पोलीस अधीक्षकांपर्यंत ऑनलाइन फॉर्म भरण्यास येतात.
गेल्या वर्षी 152 पोलीस कर्मचार्यांचा गौरव
गेल्या वर्षी म्हणजेच 2021 साली 152 पोलीस कर्मचार्यांना उत्कृष्ट तपासासाठी केंद्रीय गृहमंत्री पदकं प्रदान करण्यात आलं होतं. 2021 मध्ये हे पुरस्कार मिळालेल्या कर्मचार्यांमध्ये सीबीआयचे 15, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र पोलिसांचे प्रत्येकी 11, उत्तर प्रदेशचे 10, केरळ आणि राजस्थान पोलिसांचे नऊ, तामिळनाडू पोलिसांचे आठ, बिहारचे सात, गुजरातमधील प्रत्येकी सहा पोलिसांचा समावेश आहे.