सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली विरोधीपक्षांची बैठक, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार
शिवसेनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहेत. कोरोना संकटकाळात विरोधकांची अशी बैठक पहिल्यांदाच होत आहे. या बैठकीत कोरोनाच्या स्थितीवर तपशीलवार चर्चा होईल.
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीला शिवसेनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहेत. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीला पहिल्यांदाच ठाकरेंची उपस्थिती असेल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर झालेल्या पहिल्या दिल्ली दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी यांचीही भेट घेतली होती.
कोरोना संकटकाळात विरोधकांची अशी बैठक पहिल्यांदाच होत आहे. या बैठकीत कोरोनाच्या स्थितीवर तपशीलवार चर्चा होईल. उद्या दुपारी 3 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही चर्चा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, डीएमकेसह देशातल्या 22 पक्षांचा या बैठकीत सहभाग असल्याची माहिती काँग्रेस सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी, डीएमके नेता स्टालिन, लोकतंत्रिक जनता दलाचे नेता शरद यादव, आरजेडी नेता तेजस्वी यादव, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि सपा अध्यक्ष अखिलेश यादव उपस्थित राहणार आहेत.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात कर्नाटकमध्ये गुन्हा दाखल
कधीकाळी एनडीएचा प्रमुख घटक असलेली शिवसेना आता यूपीएच्या जवळ येत असल्याचं चित्र त्यामुळे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात झालेल्या सत्ताबदलानंतर राष्ट्रीय पातळीवरही त्याची झलक यामुळे पाहायला मिळत आहे. नागरिकत्व विधेयकावर शिवसेनेनं लोकसभेत बाजूनं मतदान केलं होतं, मात्र काँग्रेसकडून नाराजी व्यक्त झाल्यानंतर राज्यसभेत मात्र मतदानावर बहिष्कार टाकला होता.
महाराष्ट्रातल्या सत्तेत सामील होण्याआधी शिवसेनेनं केंद्रात असलेलं आपलं एकमेव मंत्रिपदही सोडलं होतं. अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतरच काँग्रेस राष्ट्रवादीच्या शिवसेनेसोबतच्या चर्चांना वेग आला होता. त्यामुळे आता उद्याच्या सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत शिवसेनेचा सहभाग हा राजकीयदृष्ट्या महत्वाचा असेल. या बैठकीनंतर विरोधी पक्षांची नेमकी पुढची काय रणनीती ठरते याकडेही सगळ्यांचं लक्ष असेल.
Sonia Gandhi, Cm Thackeray, Sharad Pawar meeting | सोनिया गांधी; उद्धव ठाकरे, शरद पवार यांची उद्या बैठक