कोरोनावर औषध किंवा लस येत नाही तोपर्यंत मास्क आणि सोशल डिस्टन्स हेच उपाय : पंतप्रधान नरेंद्र मोदी
उत्तर प्रदेश सरकारच्या आत्मनिर्भर रोजगार अभियानाचं उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. उत्तर प्रदेशातील कोरोनाशी लढणारे डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉय, पोलीस, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, बँकातील कर्मचारी तसंच जीवनावश्यक सेवेतील सर्वच कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसवर परिणामकारक औषध येत नाही किंवा त्यावर प्रतिबंधात्मक लस येत नाही तोपर्यंत दो गज की दुरी किंवा दोन हाताचं अंतर आणि तोंडाला मास्क हेच उपाय असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. ते उत्तर प्रदेश सरकारच्या आत्मनिर्भर रोजगार अभियानाचं उद्धाटन करताना बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशमध्ये आत्मनिर्भर उत्तर प्रदेश रोजगार अभियानाची सुरुवात केली. पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंच्या माध्यमातून या कार्यक्रमाची सुरुवात केली. कोरोना व्हायरसच्या साथीमुळे देशभरातून तब्बल 30 लाख स्थलांतरित मजूर उत्तर प्रदेशात परतले आहेत. या सर्व स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या राज्यात रोजगार मिळावा यासाठी ही योजना राबवण्यात येणार आहे. राज्यातल्या तब्बल 31 जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 25 हजार स्थलांतरित मजूर वेगवेगळ्या महानगरातून आलेले आहेत.
आत्मनिर्भर उत्तर प्रदेश रोजगार अभियानांतर्गत मनरेगामध्ये 60 लाखांपेक्षा जास्त मजुरांना दररोज रोजगार मिळवून देण्याचं लक्ष्य आहे. आकारमानाच्या दृष्टीने उत्तर प्रदेश जगातील अनेक देशांपेक्षा मोठा असल्याचं सांगत पंतप्रधानानी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोरोना व्हायरसच्या महामारीला रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नाचं कौतुक केलं. उत्तर प्रदेशातील कोरोनाशी लढणारे डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉय, पोलीस, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, बँकातील कर्मचारी तसंच जीवनावश्यक सेवेतील सर्वच कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
युरोपातील फ्रान्स, इटली, स्पेन आणि यूके या कोरोनाबाधित देशांच्या एकत्रित लोकसंख्येपेक्षाही जास्त लोक उत्तर प्रदेशमध्ये राहतात. पण या सर्व देशांमध्ये मिळून एक लाखापेक्षा जास्त कोरोना मृत्यू झाले तर उत्तर प्रदेशने हा आकडा फक्त 600 मर्यादित ठेवला. यासाठी त्यांनी उत्तर प्रदेश सरकारची प्रशंसा केली.
देशभरातल्या महानगरांमधून उत्तर प्रदेशात परत आलेल्या स्थलांतरीत मजुरांपैकी तब्बल तीन लाख मजुरांच्या कौशल्याची नोंद करण्यात आलीय, ते ज्या प्रकारचं काम देशाच्या वेगवेगळ्या भागात करत होते, त्यांना तसंच काम उत्तर प्रदेशात मिळवून दिलं जाणार आहे.