मसाला किंग आणि MDH चे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचं निधन
एमडीएचचे मालक आणि मसाला किंग म्हणून प्रसिद्ध असेलल्या महाशय धर्मपाल गुलाटी यांचं निधन झालं. मसाल्याचे दुकानदार ते उद्योजक असा त्यांचा प्रवास थक्क करणारा होता.
नवी दिल्ली : देशातील मसाल्याची कंपनी 'महाशिया दी हट्टी' अर्थात एमडीएचचे मालक आणि मसाला किंग म्हणून प्रसिद्ध असेलल्या महाशय धर्मपाल गुलाटी यांचं निधन झालं. आज (3 डिसेंबर) सकाळी पाच वाजून 38 मिनिटांनी वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दुपारी दोन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. गुलाटी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामधून ते बरेही झाले होते. परंतु आज सकाळी दिल्लीच्या माता चंदन देवी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
धर्मपाल गुलाटी यांचा मसाल्याचे दुकानदार ते उद्योजक असा प्रवास थक्क करणारा होता. ते 2000 कोटी रुपयांच्या बिजनेस ग्रुपचे मालक होते. महाशय धर्मपाल गुलाटी यांचा जन्म 27 मार्च 1923 रोजी पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये झाला होता. इथेच त्यांच्या व्यवसायाचा पाया रचला होता. त्यांनी आपल्या आयुष्यात फाळणीचं दु:ख, गरिबी पाहिली, टांगा चालवला आणि त्यानंतर मसाल्याचं दुकान सुरु केलं. त्यांच्या मेहनत आणि जिद्दीमुळेच ते मसाला किंग बनवलं. 1947 मध्ये देशाच्या विभाजनानंतर ते भारतात आले.
या दुकानानंतर त्यांच्या मसाल्यांचा व्यवसाय वाढत गेला. आज भारत आणि दुबईमध्ये त्यांच्या मसाल्याचे कारखाने आहेत. या कारखान्यात तयार झालेले एमडीएच मसाले जगभरात पोहोचवले जातात. एमडीएचची 62 उत्पादनं आहेत.
धर्मपाल गुलाटी यांनी केवळ पाचवीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर ते शाळेत गेले नाहीत. त्यांचं पुस्तकी शिक्षण जरी कमी असलं तरी व्यवसायात त्यांनी आपलं नाणं खणखणीत वाजवलं.
धर्मपाल गुलाटी आपल्या उत्पादनांची जाहिरात स्वत:च करायचे. अनेकांनी त्यांना टीव्हीवर एमडीएच मसाल्यांच्या जाहिरातींमध्ये पाहिलं असेल. जाहिरात विश्वातील ते सर्वात वृद्ध स्टार होते. यूरोमॉनिटरच्या माहितीनुसार धर्मपाल गुलाटी एफएमसीजी (फास्ट मूविंग कन्झ्युमर गुड्स) क्षेत्रात सर्वात कमाई करणारे सीईओ होते. 2018 मध्ये त्यांना 25 कोटी वेतन मिळत होतं. धर्मपाल गुलाटी आपल्या वेतनातील 90 वाटा दान करत होते. ते 20 शाळा आणि एक रुग्णालयही चालवत होते.
व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी भारत सरकारने त्यांना देशातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषणने सन्मान केला आहे. मागील वर्षी प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.