Mann Ki Baat Highlights: 'चांद्रयान मोहीम ही नव्या भारतासाठी प्रेरणादायी', 'मन की बात'मधून पंतप्रधानांचे देशवासियांना संबोधन
Mann Ki Baat Highlights: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचा 104 वा भाग प्रसारित झाला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांद्रयानविषयी चर्चा केली आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 'मन की बात' (Mann Ki Baat) या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांना संबोधित केले आहे. मन की बात कार्यक्रमाचा भाग हा प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रदर्शित केला जातो. आज म्हणजेच रविवार 27 ऑगस्ट रोजी या कार्यक्रमाचा 104 वा भाग प्रसारित करण्यात आला आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी चांद्रयान-3 च्या मोहिमेच्या यशाचे कौतुक करत नव्या भारतासाठी ही प्रेरणादायी मोहीम असल्याचे म्हटले आहे. तसेच या क्षणाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची कविता देखील ऐकवली आहे.
यावेळी पंतप्रधानांनी म्हटले की, "चांद्रयानाचे यश हे खूप मोठे आहे. प्रत्येक ठिकाणी चांद्रयानाची चर्चा होत आहे. यशाचा सूर्य हा चंद्रावर देखील उगवतो असं चांद्रयानाच्या यशानंतर म्हटलं जात आहे. चांद्रयान भारताचे असे स्पिरीट बनले आहे, जे कोणत्याही परिस्थितीमध्ये फक्त जिंकण्याचे ध्येय साध्य करु शकते."
'चांद्रयान नारीशक्तीचं उदाहरण'
पंतप्रधान मोदी यांनी चांद्रयानाच्या मोहिमेतील नारीशक्तीच्या योगदानाबद्दल देखील भाष्य केलं आहे. यावर बोलताना त्यांनी म्हटलं आहे की, "भारतातील महिला या आता अंतराळाला देखील आव्हान देत आहेत. भारताच्या मुलींची महत्त्वकांक्षा इतकी वाढली आहे की, देशाचा विकास करण्यापासून त्यांना आता कोणीही थांबवू शकत नाही."
जी-20 साठी भारत तयार : पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन की बातमध्ये जी-20 परिषदेचा देखील उल्लेख केला आहे. सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या जी-20 परिषदेसाठी भारत तयार असल्याचे यावेळी पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. तसेच G-20 परिषदेच्या इतिहासातील भारताचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सहभाग असणार असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना पंतप्रधानांनी म्हटले की, "भारताच्या अध्यक्षतेखाली जी-20 चे व्यासपीठ हे सर्वसमावेशक बनले आहे. भारताच्या निमंत्रणावरुनच आफ्रिकन देश हे जी-20 परिषदेमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे आता आफ्रिकन देशाचा आवाज हा जगातील महत्त्वाच्या व्यासपीठावरुन प्रत्येकापर्यंत पोहोचणार आहे."
चीनमधील जागतिक विद्यापीठ स्पर्धांचा उल्लेख
चीनमध्ये काहीच दिवसांपूर्वी जागतिक विद्यापीठ स्पर्धांचा देखील उल्लेख केला आहे. तसेच यावेळी भारताच्या मुलांनी त्यांचा सर्वोत्कृष्ट खेळ खेळला असून आपल्या खेळाडूंनी एकूण 26 पदकं या स्पर्धांमध्ये जिंकली आहेत. यामधील 11 सुवर्ण पदकं आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी या खेळाडूंशी देखील संवाद साधला आहे.
पुढे बोलताना पंतप्रधानांनी म्हटले आहे की, 1959 पासून सरु झालेल्या जागतिक विद्यापीठ खेळांमध्ये भारताने जिंकलेल्या एकूण पदकांची संख्या ही आतापर्यंत 18 होती. पण यंदाच्या एका वर्षात एकूण 26 पदके भारताला मिळाली आहेत. तसेच आपल्या पारंपारिक खेळांना प्रोत्साहन दिले आहे.
जागतिक संस्कृत दिनाच्या शुभेच्छा
पंतप्रधान मोदी यांनी विश्व संस्कृत दिनाच्या संस्कृतमधून शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय संस्कृतीतील संस्कृतचे महत्त्व पंतप्रधान मोदींनी सांगितले आहे. संस्कृत ही प्राचीन भाषा असून योग, शास्रांसारख्या गोष्टी संस्कृत भाषांमध्ये आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
हेही वाचा :
B20 Summit : पंतप्रधान मोदी आज B20 शिखर परिषदेला संबोधित करणार; आर्थिक विकासाला चालना देण्यावर लक्ष