दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांना अटक का झाली? वेगवेगळ्या कारणांमुळे जेलमध्ये जाणारे आपचे पाचवे मंत्री
Manish Sisodia News : दिल्ली, पंजाब जिंकून राष्ट्रीय महत्वकांक्षा वाढत चाललेल्या आपभोवती कारवाईचा ससेमिराही वाढत चालला आहे
Manish Sisosdiya Arrested : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Delhi DCM Manish Sisodiya) यांना सीबीआयनं अटक (Delhi DCM Manish Sisodiya Arrested by CBI) केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ज्या मद्य धोरणावरुन आरोप प्रत्यारोपाचं राजकारण रंगत होतं. त्याच प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीतलं वातावरण सध्या सीबीआयच्या कारवाईने चांगलंच तापलं आहे. कारण ही कारवाई थेट दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांवर केली आहे. आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयनं काल अखेर अटक केली. दिल्लीतल्या मद्य धोरणात बदल करताना काही ठराविक लोकांनाच फायदा मिळवून दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून जन्म घेतलेला पक्ष अशी आम आदमी पक्षाची ओळख आहे. पण गेल्या काही काळांमध्ये आमदार ते मंत्री असे अनेक लोक वेगवेगळ्या आरोपांखाली अटक झाले आहेत. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन हे मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली जेलमध्ये आहेत. याआधी सोमनाथ भारती यांच्यावरही घरगुती हिंसाचाराचे आरोप होते. मनीष सिसोदिया हे अटक झालेले आपचे पाचवे मंत्री आहेत. मनीष सिसोदिया यांच्यावर मद्य धोरणात चुकीचे बदल करुन पैसे मिळवल्याचा आरोप आहे
दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांना कशामुळे अटक?
- 2020-21 मध्ये दिल्लीतल्या मद्य धोरणात दिल्ली सरकारने बदल केला होता
- काही ठराविक कंत्राटदारांनाच त्यात फायदा मिळवून दिल्याचा आरोप मनीष सिसोदिया यांच्यावर आहे
- ठराविक संस्थांच्या परवानग्या न घेताच याबाबत लायसन्स फीमध्ये सवलत दिल्याचाही आरोप
- मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ देणारे निर्णय हे केवळ पक्षपातीपणे घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
या संपूर्ण प्रकरणात ईडी आणि इतर यंत्रणांचीही नजर होतीच. सीबीआयनेही याबाबात कारवाईला सुरुवात केली होती. याआधीही सिसोदियांची चौकशीही झाली होती. पण रविवारी (26 फेब्रुवारी) आठ तासांच्या चौकशीनंतर त्यांची थेट अटकच झाली. त्याआधी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींच्या समाधीस्थळाचं दर्शनही सिसोदिया यांनी घेतलं होतं.
भाजप आणि आपमध्ये आरोप-प्रत्यारोप
या संपूर्ण प्रकरणात भाजप आणि आपमध्ये मात्र आरोप प्रत्यारोपाची स्पर्धा सुरु आहे. एकीकडे 2024 ची लोकसभा निवडणूक जवळ येत आहे. त्याचवेळी दिल्ली, पंजाब जिंकून राष्ट्रीय महत्वकांक्षा वाढत चाललेल्या आपभोवती कारवाईचा ससेमिराही वाढत चालला आहे. आता यातून हे राजकारण कुठल्या वळणाला जाणार हे लवकरच कळेल.
इतर महत्त्वाच्या बातम्या :