एक्स्प्लोर
मानसी जोशी : एका पायावर खेळून सुवर्णपदक मिळवणारी फुलराणी
मानसीने वर्ल्ड पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये विश्वविजेतेपदावर नाव कोरलं. मात्र, या मानसीचा सुवर्णापर्यंतचा प्रवास खूप खडतर होता.
मुंबई : सुवर्ण सिंधू... वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये सिंधूने सुवर्ण जिंकलं आणि सारा देश तिच्या सेलिब्रेशनमध्ये सामील झाला. मात्र, त्याच्या आदल्या दिवशी आणखी एका भारतीय बॅडमिंटनपटूने जग जिंकलं होतं आणि तिचं नाव आहे मानसी जोशी.
मानसीने वर्ल्ड पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये विश्वविजेतेपदावर नाव कोरलं. मात्र, या मानसीचा सुवर्णापर्यंतचा प्रवास खूप खडतर होता. बॅडमिंटनची आवड असलेल्या मानसीने मुंबईच्या सोमय्या कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण होताच तिला मोठ्या कंपनीत जॉबही लागला. मात्र, तिथेही तिने बॅडमिंटनचा छंद जोपासला.
मानसीच्या आयुष्यात सगळं सुरुळीत सुरु असतानाच 2011 साली एक दुर्घटना घडली. नेहमीप्रमाणे ती आपल्या स्कूटीवरुन ऑफिसला निघाली. एक सिग्नल पार करताना तिच्या स्कूटीवर एक भरधाव ट्रक धडकला. त्यावेळी तिथे एकही पोलिस आधिकारी नव्हता. त्यामुळे ट्रक फरार झाला. मात्र, अपघातात मानसीचा पाय गेला. पुढे सिग्नल ते हॉस्पिटलपर्यंतचा मानसीचा प्रवासही वेदनादायीच होता.
वयाच्या 22व्या वर्षी झालेल्या अपघाताने मानसीच्या आयुष्याला मोठं वळण आणलं. डिप्रेशनच्या गर्तेत गेलेल्या मानसीला पुन्हा उभं करण्याची जबाबदारी तिच्या घरच्यांसमोर होती. तिच्या कंपनीने मानसीच्या उपचारासाठी पैसा उभा केला. उपचारातून तिला कृत्रिम पाय बसवण्यात आला आणि सुरु झाला प्रवास गोल्ड मेडलचा.
2014 साली मानसीने बॅडमिंडनचं प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करणाऱ्या मानसीला जागतिक स्टेज खुणावत होतं. त्याच दरम्यान तिला सायना नेहवाल, पी व्ही सिंधूसह पी. गोपीचंद यांचं मार्गदर्शन लाभलं. 2015 साली मानसीनं वर्ल्ड पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक मिळवलं. त्यावर्षी तिने अनेक स्पर्धा गाजवल्या. यंदा महाराष्ट्र सरकारने एकलव्य पुरस्कार देऊन तिचा सन्मानही केला.
एवढ्यांचा आशीर्वाद आणि जिंकण्याच्या जिद्दीने मानसीने यंदाच्या वर्ल्ड पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिपचा प्रवास सुरु केला. भारताच्याच पारुलवर 21-12,21-07 च्या फरकाने विजय मिळवत तिने प्रवासाचा सुवर्ण शेवट केला. आता मानसीने देशाला पॅराऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवूण देण्याचं स्वप्न घेऊन नव्या प्रवासाला सुरुवातही केली आहे. आपल्या जिद्दीच्या जोरावर देशाचं नाव उंचावणारी मानसी करोडो भारतीयांना प्रेरणा देत राहणार हे नक्की.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शिक्षण
महाराष्ट्र
क्रिकेट
भारत
Advertisement