Majha Maharashtra Majha Vision 2020 | केंद्र सरकारने लागू केलेल्या पहिल्या लॉकडाऊनमुळे कोरोनाचा प्रसार वाढला : जयंत पाटील
एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपलं व्हिजन स्पष्ट केलं. सध्याच्या परिस्थितीत अर्थव्यवस्था सुरु राहिली पाहिजे आणि कोरोनावर नियंत्रणही मिळवलं पाहिजे, असा सूवर्णमध्य साधणं गरजेचं आहे, असं जयंत पाटलांनी म्हटलं.
मुंबई : देशात आणि राज्यात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. रुग्णसंख्ये दिवसेदिवेस वाढ होताना दिसत आहे. या परिस्थितीला केंद्र सरकारने जाहीर केलेलं पहिलं लॉकडाऊन जबाबदार असल्याचा आरोप राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात ते बोलत होते.
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झालं आणि एक नवी आघाडी उदयास आली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं. महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच राज्याला कोरोनाने विळखा घातला. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच आहे. अशातच आता या जीवघेण्या कोरोना व्हायरसमधून महाराष्ट्राला मुक्त करण्यासाठी सरकारचं व्हिजन काय आहे? त्याचबरोबर कोरोना व्हायरसमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या परिणामांचा सरकार कसा सामना करणार आहे? तसेच सरकारला त्यांच्या कार्याची जाण करुन देणाऱ्या विरोधकांची भूमिका काय आहे? हे जाणून घेण्यासाठी एबीपी माझाचा खास उपक्रम माझा महाराष्ट्र माझं व्हिजन हा कार्यक्रम आज होत आहे.
कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्यानं वाढण्याचं मोठं कारण म्हणजे केंद्र सरकारने पहिला लॉकडाऊन लागू करताना कुणालाही विश्वासात घेतलं नाही. पहिला लॉकडाऊन लागू करण्याआधी काही दिवसांची मुदत देणे आवश्यक होते. जेणेकरुन सर्व व्यवस्था उभारण्यास राज्य सरकारला वेळ मिळाला असता. स्थलांतरितांचे हाल झाले नसते आणि कोरोनाचा संसर्ग न घेता लोक आपआपल्या निश्चित स्थळी पोहोचले असते. मात्र नोटबंदीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक देशात लॉकडाऊन जाहीर केला. मात्र परिस्थिती बिघडल्यानंतर मुंबई, पुण्यातील किंवा शहरी भागातून लोक पायी किंवा मिळेल त्या मार्गाने आपआपल्या गावी पोहोचले आणि सोबत कोरोनाही घेऊन गेले, त्यामुळे ग्रामीण भागात आज परिस्थिती बिघडत असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं.
महाराष्ट्र आणि देशातील स्थिती अभूतपूर्व आहे. जगाच्या कोपऱ्यात कोरोनाची स्थिती निर्माण झाली त्यावेळीच आपण जागे होणे गरजेचं होतं. मात्र आपल्या दारात आल्याशिवाय आपल्याला कळत नाही. शहरी भागांपासून कोरोनाचे रुग्ण गावागावात आढळत आहे. लॉकडाऊमुळे कोरोना रोखण्यात मोठं यश मिळालं आहे. मात्र आता अर्थव्यवस्था सुरु राहिली पाहिजे आणि कोरोनावर नियंत्रणही मिळवलं पाहिजे, असा सूवर्णमध्य साधणं गरजेचं आहे. राज्य सरकारच्या तिजोरीत पैसा कसा येईल यासाठीही शासन प्रयत्न करत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार कर्ज काढून द्यावे लागत असल्याचंही जयंत पाटलांनी सांगितलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील आपलं व्हिजन मांडणार आहेत. त्याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, आरोग्य मंत्री राजेश टोपे, उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि कृषी मंत्री दादाजी भुसे इत्यादी नेत्यांनी आपलं व्हिजन मांडलं. याशिवाय मनोरंजन क्षेत्राचं व्हिजन काय असावं यावर चर्चा झाली. यामध्ये अभिनेते प्रशांत दामले, दिग्दर्शक महेश मांजरेकर, निर्माते नितीन वैद्य, संगीतकार अतुल गोगावले हे देखील सहभागी झाले.
इतर बातम्या
- Majha Maharashtra Majha Vision 2020 | शटडाऊन, लॉकडाऊन नको; आता सगळं सुरु करा : राज ठाकरे
- Majha Maharashtra Majha Vision 2020 | उद्धव ठाकरे मला टीव्हीवर दिसले, कारभार दिसलाच नाही : राज ठाकरे