महाराष्ट्रातील राजकीय भूकंपामागे गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा मोठा हात; कोण आहेत CR पाटील?
Know About CR Patil : सी आर पाटील हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्ती मानले जातात. सी.आर पाटील हे 'ऑपरेशन लोटस'ची महत्वाची भूमिका पार पाडत असल्याची माहिती समोर आली आहे.
BJP : बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. या भूकंपाचं केंद्र ठरलं गुजरातमधील सूरत. या राजकीय भूकंपामागे गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा मोठा हात असल्याचं बोललं जात आहे. गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांना या घडामोडीत महत्त्वं आलं आहे. शिंदे यांच्या उद्धव ठाकरेंविरोधातील बंडखोरीमागे गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील हे प्रमुख व्यक्ती असल्याचे बोलले जात आहे. बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले शिवसेनेचे आमदार सुरतमधील हॉटेल ले मेरिडियनमध्ये तळ ठोकून होते. विशेष म्हणजे या हॉटेलमधील खोल्या 20 जूनच्या संध्याकाळीच बुक करण्यात आल्या होत्या.
सुरतमध्ये ली मेरिडियन हॉटेलमधली सगळी व्यवस्था स्वतः पाटलांनी केली होती. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत याच सी.आर. पाटील यांचा उल्लेख करून भाजपवर जोरदार आगपाखड केली होती. मुळचे जळगावचे असलेले सी आर पाटील हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्ती मानले जातात. सी.आर पाटील हे 'ऑपरेशन लोटस'ची महत्वाची भूमिका पार पाडत असल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार आल्यानंतर पाटील यांनी त्यांच्या सर्व नियोजित बैठका रद्द केल्या. ते अहमदाबादला होते नंतर ते तात्काळ सुरतला रवाना झाले. शिंदे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली आहे.
कोण आहेत सी. आर पाटील ?
गुजरातमधील नवसारी लोकसभा मतदारसंघाचे खासदार चंद्रकांत रघुनाथ पाटील. चंद्रकात पाटील अर्थात सीआर पाटील यांच्याकडे राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. पाटील हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे निकटवर्ती मानले जातात. गुजरातच्या नवसारी लोकसभा मतदारसंघातून त्यांनी कॉंग्रेसच्या उमेदवाराला 6.89 लाख मतांनी पराभूत केलं होतं.
सीआर पाटील यांचा जन्म 1955 साली महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातील पिंपरी आक्राऊट गावी झाला. त्यावेळी जळगाव मुंबई प्रांताचा भाग होता. सीआर पाटील यांनी आपलं प्राथमिक शिक्षण दक्षिण गुजरातमधून पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी सुरत इथल्या आयटीआय अर्थात इंडस्ट्रिअल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या संस्थेतून सर्टिफिकेट कोर्स पूर्ण केला.25 डिसेंबर 1989 रोजी अटल बिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत सीआर पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.2009 मध्ये ते पहिल्यांदा खासदार झाले. 2014 मध्ये गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होते. त्यावेळी पाटील नवसारी मतदारसंघातून उमेदवार होते.2019 निवडणुकांमध्ये त्यांनी 6,89,000 च्या मताधिक्याने विजय मिळवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यापेक्षाही पाटील यांना जास्त मतं होती.
कन्येने महाराष्ट्रात
जिल्हापरिषदेची पोटनिवडणूक गाजवली
गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सी. आर. पाटील यांच्या कन्येने जिल्हा परिषदेची पोटनिवडणूक गाजवली होती. धुळे जिल्ह्यातील लामकानी गटात धरती देवरे यांनी 4 हजार 296 इतकं मताधिक्य मिळवत निवडणूक जिंकली होती.
सी. आर. पाटील हे आपल्या कामात तंत्रज्ञानाचा अतिशय खुबीने उपयोग करतात. त्यांच्या ऑफिसला आयएसओ हे प्रमाणपत्र मिळाले आहे. हे प्रमाणपत्र मिळवणारे ते एकमेव खासदार आहेत. पाटील यांच्या कार्यालयात मोठ्या कर्मचाऱ्यांचा फौजफाटा आहे.पाटील यांच्या कार्यालयातून दररोज महिन्याला अडीच लाख पत्र परिसरातील मतदारसंघातील नागरिकांना पाठविली जातात.