Mahakumbh Stampede : मौनी अमावस्येचाच दिवस, कुंभमेळ्यावेळी 12 वर्षांपूर्वी प्रयागराज रेल्वेस्टेशनवर चेंगराचेंगरी, ज्यात 36 जणांनी गमावलेला जीव
Mahakumbh 2025 Stampede News : प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या कुंभमेळ्यात मध्यरात्री चेंगराचेंगरीची घटना घडली, यात 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
Mahakumbh 2025 Stampede News प्रयागराज : प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरीची घटना मध्यरात्री (29 जानेवारी) ला घडली. यामध्ये सूत्रांच्या माहितीनुसार 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मात्र, याला अद्याप यंत्रणांकडून अधिकृतपणे दुजोरा देण्यात आलेला नाही. 12 वर्षांपूर्वी कुंभमेळ्यात दुर्घटना घडली होती. त्यावेळी प्रयागराज रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी झाली होती, ज्यात 36 जणांचा मृत्यू झाला होता.
2013 ला प्रयागराजमध्ये काय घडलं होतं?
प्रयागराजला 12 वर्षांपूर्वी म्हणजेच 2013 मध्ये झालेल्या कुंभमेळ्यात देखील एक दुर्घटना घडली होती. मौनी अमावस्येला ज्या दिवशी अमृत स्नान होणार होतं त्यावेळी चेंगराचेंगरी झाली होती. 10 फेब्रुवारी 2013 ला प्रयागराज रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी झाली होती. ज्यामध्ये 36 लोकांनी जीव गमावला होता.
योगी आदित्यनाथांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कुंभमेळा आयोजनाचे प्रमुख अधिकारी विजय किरण आनंद यांनी पूर्ण माहिती दिली आहे. यामध्ये चेंगराचेंगरी कोणत्या कारणामुळं झाली, याची माहिती देण्यात आली. याशिवाय डीजीपी प्रशांत कुमार, संजय प्रसाद हे प्रयागराज प्रशासनाच्या संपर्कात आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील योगी आदित्यनाथ यांच्यासोबत चर्चा केली आहे. अमित शाह यांनी योगी आदित्यनाथांकडून या प्रकरणाची माहिती घेतली. केंद्र सरकारकडून पूर्णपणे मदत केली जाईल, असं शाहांनी योगी आदित्यनाथांना सांगितलं.
अध्यात्मिक गुरु देवकीनंदन ठाकूर यांनी या घटनेसंदर्भात भाविकांना आवाहन केलं आहे. संगम घाटावर गेलो नाही कारण तिथं गर्दी होती, असं ते म्हणाले. लोकांना आवाहन करतो की त्यांनी फक्त संगम घाटावर स्नान करण्याचा आग्रह करु नये.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा योगींना दुसऱ्यांदा फोन
पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवर लक्ष ठेवून आहेत. एका तासाच्या कालावधीमध्ये त्यांनी दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली. जखमींची काय व्यवस्था करण्यात आली या संदर्भात नरेंद्र मोदी यांनी माहिती घेतली. याशिवाय नरेंद्र मोदींनी भाविकांना तात्काळ मदत करण्याचे आदेश दिले.
नेमकी घटना कशी घडली?
मौनी अमावस्येच्या निमित्तानं संगम घाटावर स्नान करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. महाकुंभमेळा क्षेत्रात काही महिला श्वसनाच्या त्रास होऊन बेशुद्ध होऊन कोसळल्या आणि चेंगराचेंगरी सारखी स्थिती निर्माण झाली, अशी माहिती उत्तर प्रदेश सरकारच्या हवाल्यानं देण्यात आली आहे. जेव्हा परिस्थिती बिघडली त्यावेळी रुग्णवाहिका बोलावण्यात आल्या. यामध्ये 10 जणांचा मृ्त्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, सरकारनं याला दुजोरा दिलेला नाही.
इतर बातम्या :