LPG Price : व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी कपात, जाणून घ्या नवे दर
LPG Price : तेल विपणन कंपन्यांनी मोठा दिलासा दिला आहे. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. कंपन्यांनी आजपासून 19 किलो व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती 171.50 रुपयांनी कमी केल्या आहे
LPG Price : तेल विपणन कंपन्यांनी मोठा दिलासा दिला आहे. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या (Commercial LPG Cylinder) दरात कपात करण्यात आली आहे. कंपन्यांनी 1 मे म्हणजेच आजपासून 19 किलो व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती 171.50 रुपयांनी कमी केल्या आहेत. त्यामुळे आजपासून देशाची राजधानी दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 1856.50 रुपये झाली आहे. तर आर्थिक राजधानी मुंबईत 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरसाठी 1808.50. रुपये मोजावे लागणार आहे. दरम्यान घरगुती एलपीजी सिलेंडरच्या (LPG Cylinder) दरात मात्र कोणताही बदल झालेला नाही.
व्यावसायिक गॅस सिलेंडर दोन महिन्यात 263 रुपयांनी स्वस्त
याआधी 1 एप्रिल रोजी म्हणजेच महिनाभरापूर्वी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात 91.50 रुपयांनी कपात करण्यात आली होती. त्यानंतर आज 19 किलो एलपीजी सिलेंडरचे दर 171.50 रुपयांनी कमी करण्यात आले आहेत. अशाप्रकारे व्यावसायिक एलपीजी सिलेंडर मागील दोन महिन्यांत 263 रुपयांनी स्वस्त झाला आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोलियम कंपन्या एलपीजी सिलेंडरचे नवीन दर ठरवतात, त्यानुसार आज 171.50 रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महानगरांमधील व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचे दर काय?
आजपासून कोलकातामध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 1960.50 रुपये, मुंबईत 1808.50 रुपये, दिल्लीत 1856.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 2021.50 रुपयांनी मिळणार आहे. कोलकातामध्ये 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत पूर्वी 2132.00 रुपये होती, जी आता 1960.50 रुपयांवर आली आहे. मुंबईत एलपीजी सिलेंडरची किंमत 1980 रुपयांवरुन 1808 रुपयांवर आली आहे. चेन्नईमध्ये सिलेंडरचे दर 2192 रुपयांवरुन आता 2021 रुपयांवर आले आहेत.
वर्षभरात 499 रुपयांची कपात
1 मे 2022 रोजी दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 2355.50 रुपयांना उपलब्ध होता. आज त्याची किंमत 1856.50 रुपयांपर्यंत खाली आली आहे. म्हणजेच गेल्या वर्षभरात व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 499 रुपयांनी स्वस्त झाला आहे.
याआधी दर कधी वाढले?
पेट्रोलियम आणि तेल विपणन कंपन्यांनी या वर्षी 1 मार्च रोजी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमती 350.50 रुपये प्रति युनिट आणि घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमती 50 रुपयांनी वाढवल्या होत्या. यापूर्वी 1 जानेवारी रोजी व्यावसायिक सिलेडरच्या दरात प्रति युनिट 25 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर कंपन्यांनी एप्रिलमध्ये सिलेंडरच्या दरात 92 आणि मे महिन्यात 171.50 रुपयांनी कपात करत दिलासा दिला आहे.
19 आणि 14.2 किलो एलपीजी सिलेंडरमध्ये फरक काय?
हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडर वापरतात. त्याचा घरगुती वापर करता येत नाही. घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या वजनात फरक आहे. व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 19 किलो वजनाचा असतो आणि घरगुती एलपीजी सिलेंडर 14.2 किलो वजनाचा असतो.