(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दिवाळीच्या तोंडावर महागाईचा भडका, एलपीजी सिलिंडर 256 रुपयांनी महागला
LPG Prices 1st Nov : ऐन दिवाळीच्या तोंडावर एलपीजी सिलिंडरच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे.
LPG Prices 1st Nov : ऐन दिवाळीच्या तोंडावर एलपीजी सिलिंडरच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. आधीच कोरोना संकट आणि इंधन दरवाढीमुळे हैराण असलेल्या नागरिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एक नोव्हेंबर रोजी कमर्शिअल सिलिंडरच्या दरात तब्बल 266 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. दिवाळीच्या तोंडावर झालेल्या या वाढीमुळे महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. राजधानी दिल्लीमध्ये 19 किलो वजनाच्या कमर्शिअल सिलिंडरची किंमत दोन हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, घरगुती वापरासाठीच्या 14.2 किलो विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत 899.50 रुपयांवर कायम आहे. गेल्या महिन्यात तेल कंपन्यांनी सबसिडी फ्री 14.2 किलोच्या सिलेंडरची किंमत 15 रुपयांनी वाढवली होती.
राजधानी दिल्लीमध्ये 19 किलो वजनाच्या कमर्शिअल सिलिंडरची किंमत 1734 रुपयांवरुन 2000.50 रुपये इतकी झाली आहे. मुंबईमध्ये 1683 रुपयांना मिळणारा कमर्शिअल सिलिंडर आता 1950 रुपयांना मिळेल. पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये 19 किलो वजनाचा कमर्शिअल सिलिंडर 2073.50 रुपयांना झालाय. चेन्नईमध्ये कमर्शिल गॅसची किंमत देशात सर्वाधिक आहे. चेन्नईमध्ये 19 किलो वजनाचा सिलिंडर घेण्यासाठी 2133 रुपये मोजावे लागतील.
LPG prices for commercial cylinders increased by Rs 266 from today onwards. Commercial cylinders of the 19 kg in Delhi will cost Rs 2000.50 from today onwards which was costing Rs 1734 earlier. No increase in domestic LPG cylinders.
— ANI (@ANI) November 1, 2021
इंधन दरवाढीचा भडका कायम :
आज वसुबारस, दिवाळीचा पहिला दिवा. तसेच 1 नोव्हेंबर, महिन्याचा पहिला दिवस. आजच्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. आज देशात पेट्रोल 35 पैशांनी आणि डिझेल 35 पैशांनी महागलं आहे. मुंबईमध्येही पेट्रोलच्या किमतीत विक्रमी वाढ झाली आहे. मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी 115 रुपये मोजावे लागणार आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत 115.50 रुपये आणि डिझेलची किंमत 106.62 रुपये प्रति लिटर आहे. अशातच कोलकातामध्ये पट्रोल आता 110.15 आणि डिझेल 101.56 रुपये प्रति लिटर आहे. याव्यतिरिक्त चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलचे दर 106.35 रुपये आणि डिझेल 102.59 रुपये प्रति लिटर आहे. तर देशाची राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत आता 109.69 रुपये आणि डिझेलची किंमत 98.42 रुपये प्रति लिटर इतकी झाली आहे. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, जर सरकारनं वेळीच योग्य पावलं उचलली नाहीत, तर मात्र लवकरच पेट्रोलचे दर 120 पार पोहोचतील. दरम्यान, कच्च्या तेलाचं उत्पादन करणाऱ्या संघटना OPEC+ या आठवड्यात संयुक्त बैठक घेणार आहेत. या बैठकीत उत्पादन वाढवण्यावर निर्णय होऊ शकतो. जर असं झालं तर किमतींमध्ये घट होऊ शकते. दरम्यान, भारतात गरजेच्या 80 टक्के कच्चं तेल परदेशातून खरेदी केलं जातं.