''राम देव नाही, केवळ रामायणातील पात्र!' माजी मुख्यमंत्र्यांचे पुन्हा वादग्रस्त विधान, नवा वाद होण्याची शक्यता
Bihar News : कार्यक्रमात भाषण देताना त्यांनी प्रभू श्रीराम यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भाजपचे जवळचे असलेले माजी मुख्यमंत्री यांनी पुन्हा वादग्रस्त विधान करीत खळबळ उडवली आहे.
Bihar News : राम देव नाही, ते केवळ रामायणातील एक पात्र होते, असे वादग्रस्त विधान बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी केले आहे. यावरून चर्चांना उधाण आले आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात भाषण देताना त्यांनी प्रभू श्रीराम यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भाजपचे जवळचे असलेले जीतन राम यांनी पुन्हा वादग्रस्त विधान करीत खळबळ उडवली आहे. गुजरात, मध्य प्रदेशसह काही राज्यांत रामनवमी उत्सवात हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. त्याचदरम्यान मांझी यांनी केलेल्या विधानामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आणखी काय म्हणाले मांझी?
ब्राह्मणांबाबतही वादग्रस्त विधान, चर्चांना उधाण
बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी म्हणाले, तुलसीदास आणि वाल्मिकींना मी मानतो. मात्र, राम देव नव्हता, त्यांना मी मानत नाही, तसेच रामायण लिहिणारे वाल्मिकी आणि तुलसीदास यांना मी मानतो. मात्र रामावर माझा विश्वास नाही, यावेळी मांझी यांनी ब्राह्मणांबाबतही वादग्रस्त विधान केले. जे ब्राह्मण मांसाहार करतात, दारू पितात, खोटे बोलतात, त्यांच्याकडून पूजाअर्चा करून घेणे पाप आहे. अशा ब्राम्हणांकडून पूजा व इतर कुठलेही धार्मिक विधी करून घेऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. पूजाअर्चा करून कुणी मोठे होत नाही, असंही जीतन राम मांझी म्हणाले. मांझी हे हिंदुस्थानी आवाम मोर्चाचे (हम) प्रमुख असून हा पक्ष भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत घटक पक्ष आहे. तसेच जीतन राम यांचा मुलगा संतोष मांझी हा बिहारच्या नितीशकुमार सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहे.
वादग्रस्त विधानांमुळे मांझी चर्चेत
जीतनराम मांझी यांनी लोकमान्य टिळक आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दलही भाष्य केलं. अतिमागास, आदिवासी आणि मागास प्रवर्ग हेच देशाचे मूळनिवासी आहेत. मोठे लोक बाहेरचे आहेत. ते आपले मूळनिवासी नाहीत. आपल्या देशात गरीब आणि श्रीमंत अशा दोनच जातीचे लोक आहेत. धनदांडग्यांची मुलं खासगी शाळेत, तर गरिबांची मुलं सरकारी शाळेत शिक्षण घेतात, असं मांझी म्हणाले. दरम्यान, जीतनराम मांझी यांनी यापूर्वीही अशीच वादग्रस्त विधाने केली आहेत. त्यामुळे ते नेहमीच चर्चेत असतात.