Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 75.72 टक्के आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये सर्वात कमी 35.97 टक्के मतदान झाले. याशिवाय आंध्र प्रदेशच्या 175 विधानसभा जागांवर आणि ओडिशाच्या 28 विधानसभा जागांवरही मतदान झाले.
Loksabha Election : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात आज (13 मे) 9 राज्ये आणि जम्मू-काश्मीरमधील एका केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांसाठी मतदान संपले. या जागांवर सायंकाळी पाचपर्यंत सरासरी 62.56 टक्के मतदानाची नोंद झाली. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 75.72 टक्के आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये सर्वात कमी 35.97 टक्के मतदान झाले. याशिवाय आंध्र प्रदेशच्या 175 विधानसभा जागांवर आणि ओडिशाच्या 28 विधानसभा जागांवरही मतदान झाले. महाराष्ट्रात 52.49 टक्के मतदानाची नोंद झाली.
लोकसभेच्या जागांवर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 62.31 टक्के मतदान
सायंकाळी 5 वाजेपर्यंत लोकसभेच्या सर्व जागांवर 62.31 टक्के मतदान झाले. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 75.66 टक्के आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये सर्वात कमी 35.75 टक्के मतदान झाले. आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत 67.99 टक्के मतदान झाले. ओडिशा विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 62.96 टक्के मतदान झाले आहे.
मतदानादरम्यान ३ जणांचा मृत्यू
आज मतदानादरम्यान, पश्चिम बंगाल, बिहार आणि महाराष्ट्रात वेगवेगळ्या कारणांमुळे तीन जणांचा मृत्यू झाला. पश्चिम बंगालमधील बोलपूरमध्ये मतदानाच्या एक दिवस आधी एका टीएमसी कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. टीएमसीने सीपीआय(एम) समर्थकांवर बॉम्बस्फोट केल्याचा आरोप केला. दुर्गापूरमध्ये भाजप आणि टीएमसी समर्थकांमध्ये हाणामारी झाली. बिहारमधील मुंगेरमध्ये मतदानापूर्वी एका पोलिंग एजंटचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मुंगेरमध्येच मतदानादरम्यान स्लिप न दिल्याने काही लोकांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली. पोलिसांनी लाठीचार्ज करून दोन तरुणांना ताब्यात घेतले. महाराष्ट्रात बीडमध्ये एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
आंध्रमध्ये आमदार-मतदाराने एकमेकांना मारली थप्पड
आंध्र प्रदेशातील गुंटूर येथील वायएसआर काँग्रेसचे आमदार अण्णाबथुनी शिवकुमार यांनी एका बूथवर एका मतदाराला थप्पड मारली. त्याला प्रत्युत्तर म्हणून मतदारानेही थप्पड मारली. यानंतर आमदार समर्थकांनी त्या व्यक्तीला मारहाण केली. रांगेत न आल्याने त्या व्यक्तीने आमदाराला अडवले, त्यामुळे वाद झाला. आंध्र प्रदेशातच मतदारांशी गैरवर्तनाचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. झहीराबादचे काँग्रेसचे उमेदवार सुरेश शेटकर यांचे भाऊ नागेश शेटकर यांनी एका मतदाराला लाथ मारली. दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला.
कोणत्या राज्यात किती टक्के मतदान?
- आंध्र प्रदेश: 68.04 टक्के
- बिहार: 54.14 टक्के
- जम्मू आणि काश्मीर: 35.75 टक्के
- झारखंड: 63.14 टक्के
- मध्य प्रदेश: 68.01 टक्के
- महाराष्ट्र: 52.49 टक्के
- ओडिशा: 62.96 टक्के
- तेलंगणा: 61.16 टक्के
- उत्तर प्रदेश: 56.35 टक्के
- पश्चिम बंगाल: 77.66 टक्के
इतर महत्वाच्या बातम्या