NDA Meeting: पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत गोवा-महाराष्ट्रातील NDA खासदारांची बैठक; उद्या होणाऱ्या बैठकीला शिंदे-अजित पवारही राहणार उपस्थित?
2024च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एनडीच्या बैठकांचं सत्र सुरू झालं आहे. आता महाराष्ट्र आणि गोव्यातील NDA खासदारांची बैठक होणार आहे. शिंदे गट आणि अजित पवारांचे खासदारही बैठकीला हजर असणार आहेत.
Lok Sabha Election 2024: पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) उद्या, म्हणजेच 8 ऑगस्ट रोजी संध्याकाळी महाराष्ट्र आणि गोव्यातील NDA च्या खासदारांची भेट घेणार आहेत. भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या खासदारांना तसेच महाराष्ट्रातील राज्यसभेच्या खासदारांनाही या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्री भारती पवार (Bharti Pawar) आणि कपिल पाटील (Kapil Patil) हे या कार्यक्रमाचे प्रमुख असणार आहेत.
दिल्लीत संध्याकाळी 7 वाजता भाजप आणि मित्रपक्षांची बैठक
पंतप्रधान नरेंद्र उपस्थितीत राजधानी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात संध्याकाळी सात वाजता एनडीएची बैठक होणार आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने गोवा आणि महाराष्ट्र राज्यातील तयारीचा आढावा पंतप्रधान घेणार आहेत. महाराष्ट्रातील भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या खासदारांसोबत पंतप्रधानांची एकत्रित बैठक होणार आहे.
महाराष्ट्रातील नेत्यांना बैठकीचं आमंत्रण
महाराष्ट्रात 48 मतदारसंघ आहेत. त्यामुळे भाजपसाठी महाराष्ट्र हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा आहे. या बैठकीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनाही खास आमंत्रित केलं गेलं आहे.
बैठकीला भाजपसह एनडीएतील घटक पक्षांच्या खासदारांना तसेच महाराष्ट्रातील राज्यसभेच्या खासदारांनाही आमंत्रित केलं गेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या सर्व खासदारांना 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीसाठी, लोकसभा निवडणुकीत जागा जिंकण्यासाठी धोरण आखण्यासाठी आणि प्रत्येक जागेबाबत माहिती जाणून घेण्यासाठी आमंत्रित केलं आहे.
या बैठकीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांचा समावेश असेल. या बैठकीत पंतप्रधान मोदी एनडीएच्या खासदारांकडून महाराष्ट्र आणि गोव्यातील लोकसभेच्या सर्व जागांचा फिडबॅक जाणून घेणार आहेत.
गोव्यातील मित्रपक्षांनाही बैठकीचं आमंत्रण
गोव्यात लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील एक-एक जागाही महत्वाची असणार आहे. त्यामुळे भाजप चांगलीच तयारीला लागली आहे. गोव्यात सध्या दोन पैकी एक खासदार भाजपचा आहे. उत्तर गोव्यात श्रीपाद नाईक हे भाजपचे खासदार आहे, ते केंद्रात राज्य मंत्रीही आहेत.
तर दक्षिण गोव्यात काँग्रेसचे फ्रान्सिस्को सार्दिन हे खासदार म्हणून निवडून आले होते. 2014 मध्ये दक्षिण गोव्याची जागाही भाजपकडे होती. ती जागा परत जिंकण्यासाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी गोव्यातील फोंडा येथे एक सभाही घेतली होती.
याशिवाय गोव्यात राज्यसभेची एक जागा आहे, त्या जागेवर नुकतेच भाजपचे गोव्याचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे हे बिनविरोध निवडून आले आहेत.
हेही वाचा:
NDA Vs INDIA : विरोधकांच्या 'इंडिया'ची मुंबईत बैठक, उद्धव ठाकरे गटाकडे जबाबदारी