(Source: ECI/ABP News/ABP Majha)
NDA Vs INDIA : विरोधकांच्या 'इंडिया'ची मुंबईत बैठक, उद्धव ठाकरे गटाकडे जबाबदारी
Opposition Meeting: भाजपविरोधी इंडिया आघाडीची दोन दिवसीय बैठक आता मुंबईत होणार आहे. बैठकीला राहुल गांधी देखील उपस्थित राहतील. विरोधी पक्षांनी यापूर्वी पाटणा आणि बंगळुरू येथे बैठका घेतल्या होत्या.
Opposition Parties Mumbai Meeting: येत्या 2024 च्या लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या विरोधी पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपला पर्याय म्हणून त्यांच्या विरोधात उभं राहण्यासाठी देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहेत आणि यासाठी विविध राज्यांत विरोधी आघाडी इंडियाचं (INDIA) खलबतं सुरू आहे. पाटणा आणि बंगळुरूनंतर इंडिया (INDIA) आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होणार आहे. 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी ही बैठक मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये होणार आहे. मुंबईत होणाऱ्या या बैठकीचं नेतृत्व ठाकरे गट करणार आहे.
मुंबईत भाजपविरोधी आघाडीची दोन दिवसीय बैठक
31 ऑगस्टच्या रात्रीपासून भाजपविरोधी आघाडीची बैठक सुरू होईल, यासाठी रात्री उद्धव ठाकरेंकडून विरोधी पक्षनेत्यांसाठी डिनरचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईतील सांताक्रूझ-कलिना परिसरातील ग्रँड हयात हॉटेलमध्ये विरोधकांची डिनर डिप्लोमसी होईल. दुसऱ्या दिवशी, म्हणजेच 1 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता विरोधी पक्ष आघाडी 'इंडिया'ची बैठक सुरू होईल. या बैठकीला विरोधी पक्षांचे अनेक नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेच दोन दिवसीय बैठकीचं नेतृत्व करतील.
मविआकडून विरोधी पक्षांच्या बैठकीची तयारी
मुंबईत होणाऱ्या विरोधी पक्षांच्या आघाडीच्या (INDIA) बैठकीपूर्वी शनिवारी (5 ऑगस्ट) मुंबईतील नेहरू सायन्स सेंटरमध्ये महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीला तिन्ही पक्षांचे बडे नेते उपस्थित होते. राष्ट्रवादीकडून शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि अनिल देशमुख, तर काँग्रेसकडून अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले उपस्थित होते. बैठकीला ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अनिल देसाई यांनी हजेरी लावली होती. या बैठकीत आगामी विरोधी पक्षांच्या आघाडीच्या बैठकीच्या तयारीवर चर्चा करण्यात आली. तिन्ही पक्षांकडून पाच नेत्यांची एक टीम तयार करण्यात आली असून ते बैठकीची तयारी करणार आहेत.
राहुल गांधींचं मुंबईत होणार भव्य स्वागत
महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर काँग्रेस नेते नसीम खान म्हणाले, तिन्ही पक्षांच्या नेत्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे मोदी आडनाव प्रकरणी राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर देशातील सर्वसामान्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सत्याचा विजय झाला, द्वेषाचा पराभव झाला, असं ते म्हणाले. राहुल गांधी (Rahul Gandhi) मुंबईत आल्यावर त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात येणार असल्याचंही काँग्रेस नेते नसीम खान म्हणाले.
हेही वाचा: