महाराष्ट्रात काँग्रेसला किती जागा हव्यात? अलायन्स कमिटीनं राहुल गांधींकडे दिला रिपोर्ट
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. एनडीए (NDA) आणि इंडिया (I.n.d.i.a) आघाडीने लोकसभेची जोरदार (lok sabha election 2024) तयारी सुरु केली आहे.
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. एनडीए (NDA) आणि इंडिया (I.n.d.i.a) आघाडीने लोकसभेची जोरदार (lok sabha election 2024) तयारी सुरु केली आहे. प्रत्येक राज्यात लोकसभा जागावाटपाची चर्चा सुरु झाल्या आहेत. इंडिया आघाडीसमोरही जागावटपाचा पेच आहे. यादरम्यान काँग्रेसच्या राष्ट्रीय समितीने (Alliance Committee) महत्वाच्या राज्यातील जागावाटपाचा रिपोर्ट पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्याकडे सोपवला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील लोकसभा जागेंची संख्या सांगण्यात आली आहे. दरम्यान, गुरुवारी दिल्लीमध्ये काँग्रेसची बैठक पार पडली, यामध्ये देशभरातील महत्वाचे काँग्रेस नेते उपस्थित होते.
मुकुल वासनिक म्हणाले की, 'आता मित्रपक्षांसोबत चर्चा होणार आहे. कमेटीमध्ये वेगवेगळ्या राज्यातील नेत्यांसोबतच्या आघाडीबाबतची चर्चा झाली, त्याची सर्व माहिती आम्ही वरिष्ठांना दिली आहे. आता लवकरच आघाडीत असणाऱ्या पक्षांसोबत जागावाटपावर चर्चा होणार आहे. प्रत्येक राज्यानुसार चर्चा होणार आहे. त्यानंतर जागावाटपाचा फॉर्मुला तयार होईल.' काँग्रेसच्या राष्ट्रीय अलायन्स समितीमध्ये (Alliance Committee) माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत, भूपेश बघेल, मोहन प्रकाश आणि सलमान खुर्शीद हे सदस्य आहेत.
मुकुल वासनिक म्हणाले की, "इंडिया आघाडीचं सरकार आणणं हाच आमचा प्रमुख हेतू आहे. आम्ही सध्या जागावाटपाला प्राधान्य देत आहे." एबीपी न्यूजला सुत्रांनी सांगितलं की, काँग्रेसच्या राष्ट्रीय अलायन्स समितीने दहा राज्यातील स्थानिक पक्षांना इंडिया (इंडियन नेशनल डेवलपमेंटल इन्क्लूसिव अलायन्स) आघाडीत घेण्याची सूचना कऱण्यात आली. यामध्ये उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, पंजाब, दिल्ली, तमिलनाडु, जम्मू कश्मीर आणि केरळ या राज्यांचा समावेश आहे.
काँग्रेसला किती जागा हव्यात ?
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसला उत्तर प्रदेशमध्ये 80 लोकसभा जागांपैकी 15 ते 20 जागा हव्या आहेत. तर महाराष्ट्रातील 48 लोकसभा जागांपैकी 16 ते 20 जागांवर दावा केला आहे. बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा आहेत, त्यामध्ये काँग्रेस सहा ते आठ जागा लढवण्याच्या तयारीत आहे. त्याशिवाय पश्चिम बंगालमधील 42 लोकसभा जागापैकी काँग्रेस पक्षाला सहा ते 10 जागांवर निवडणूक लढवायची आहे. झारखंडमध्ये 14 पैकी सात जागा काँग्रेस मागू शकतं.
दिल्लीमध्ये लोकसभेच्या सात जागा आहेत, त्यापैकी काँग्रेसने तीन जागांवर दावा ठोकलाय. तर पंजाबमधील 13 जागांपैकी काँग्रेसला सहा जागा हव्यात. पंजाबमध्ये मोठा पेच दिसतोय. पंजाबमध्ये आम आदमी पार्टी म्हणजेच आप सर्वच जागा लढवण्यावर ठाम आहे. त्याशिवाय तामिळनाडूमध्ये 8, केरळमध्ये 16 आणि जम्मू काश्मीरमध्य काँग्रेसला दोन जागा हव्यात.
महाराष्ट्रात पेच ?
महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. त्यापैकी काँग्रेस पक्षाने 16 ते 20 जागांवर दावा केलाय. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना 23 जागांवर ठाम आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) 10 ते 12 जागा लढवण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्रातही जागावाटपावरुन तिढा बसल्याचे दिसतेय. कोणता पक्ष किती जागांवर लोकसभा लढवणार? याबाबत लवकरच निर्णय स्पष्ट होईल, पण त्याआधी इंडिया आघाडीत जागावाटपावरुन रस्सीखेच सुरु असल्याचं दिसतेय.