कोरोना काळात तोटा, तरीही कर्मचाऱ्यांना बोनस; टाटा स्टीलने शब्द पाळला!
लॉकडाऊनमुळे बरेच उद्योग ठप्प झाले. परिणामी अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. ज्यांच्या नोकऱ्या टिकल्या त्यांच्या पगारात कपात झाली. एकीकडे असं नकारात्मक वातावरण असताना टाटा स्टील या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा घोषणा केली आहे. कंपनीने यंदा बोनससाठी 235.54 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
मुंबई : कोरोनाव्हायरसमुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे बरेच उद्योग ठप्प झाले. परिणामी अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. ज्यांच्या नोकऱ्या टिकल्या त्यांच्या पगारात कपात झाली. एकीकडे असं नकारात्मक वातावरण असताना देशातील मोठी स्टील कंपनी आणि टाटा समूहाच्या टाटा स्टील या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची घोषणा केली आहे. कोरोनाकाळात टाटा स्टील कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त तीन लाख रुपयांचा बोनस देणार आहे. कंपनी व्यवस्थापन आणि टाटा कामगार संघटनेत झालेल्या करारानुसार कंपनीने यंदा 235.54 कोटी रुपयांच्या बोनसची तरतूद केली आहे.
कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे इतर कंपन्यांप्रमाणे टाटा स्टील कंपनीसाठीही हे वर्ष आर्थिकदृष्ट्या कठीण होतं. कंपनीला मागील दोन तिमाहीत तोटा झाला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून या तिमाहीत कंपनीला 4648.13 कोटी रुपयांचं नुकसान झालं. तर मागील आर्थिक वर्षाच्या अखेरच्या तिमाहीत कंपनीला 1616.35 कोटी रुपयांचा तोटा झाला. परंतु कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचं तीन वर्षांचं वचन पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
किती कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार? करारानुसार यंदा 235.54 कोटी रुपये बोनस म्हणून 24 हजार 074 कर्मचाऱ्यांमध्ये वाटले जाणार आहेत. जमशेदपूर युनिट आणि ट्यूब डिव्हिजनच्या 12 हजार 807 कर्मचाऱ्यांना 142.05 कोटी रुपयांचं वाटप होईल. तर उर्वरित 93.49 कोटी रुपये कलिंगानगर युनिट, मार्केटिंग आणि विक्री, नोवामुंडी, जामाडोबा, झरिया आणि बोकारो मायनसच्या 11 हजार 267 कर्मचाऱ्यांमध्ये वाटले जातील.
'संकटकाळात कर्मचार्यांशी असे वागता, हीच तुमची नैतिकता?' रतन टाटांची नाराजी
कमाल आणि किमान बोनस किती? कर्मचाऱ्यांना सरासरी 1,10,914 रुपये बोनस मिळणार. मात्र सर्वाधिक उपस्थिती असलेल्या ओल्ड ग्रेड कर्मचाऱ्याला 3 लाख 01 हजार 402 रुपयांचा जास्तीत जास्त बोनस मिळेल. तर एनएस ग्रेडमध्या सर्वाधिक उपस्थिती असलेल्या कर्मचाऱ्याला 84 हजार 496 रुपये बोनस म्हणून मिळणार आहेत. एनएस ग्रेडच्या कर्मचाऱ्याचा किमान बोनस 26 हजार 839 रुपये निश्चित केले आहे.
नोकर आणि पगार कपात करणाऱ्यांवर रतन टाटांची नाराजी कोरोना काळात अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढत आहे. पगार कपात करत आहेत. यावर टाटा ट्रस्टचे चेअरमन आणि उद्योजक रतन टाटा यांनी काही महिन्यांपूर्वी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. कठीण काळात कंपन्यांवर कर्मचाऱ्यांची जबाबदारी असते. संकटाच्या काळात आपण आपल्या कर्मचार्यांशी असे वागता, हीच तुमची नैतिकता आहे का? असा सवालही त्यांनी केला.
"ही तिच लोक आहेत, ज्यांनी तुमच्यासाठी काम केलंय, तुमच्यासाठी कारकीर्द देणाऱ्या या लोकांना तुम्ही आज उघड्यावर सोडून देत आहात, ही तुमच्या नितिमत्तेची व्याख्या आहे का? उद्योजक आणि कंपन्यांसाठी दीर्घकाळ काम करणे आणि उत्तम कामगिरी करण्यासाठी कर्मचाऱ्यांची संवेदनशीलता सर्वोपरी असते. साथीच्या काळात तुम्ही तुमच्या कर्मचार्यांशी असे वागता, ही तुमची नैतिकता आहे का?" असा सवाल त्यांनी युवरस्टोरीला दिलेल्या मुलाखतीत केला होता.