एक्स्प्लोर
Advertisement
अपत्य प्राप्तीसाठी कोर्टाकडून कैद्याला दोन आठवड्यांची सुट्टी मंजूर
मद्रास हाय कोर्टाने तिरुनेलवेल्ली जिल्ह्यातील कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या 40 वर्षीय व्यक्तीला अपत्य प्राप्तीसाठी दोन आठवड्याची सुट्टी मंजूर केली आहे.
चेन्नई : मद्रास हाय कोर्टाने तिरुनेलवेल्ली जिल्ह्यातील कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या 40 वर्षीय व्यक्तीला अपत्य प्राप्तीसाठी दोन आठवड्याची सुट्टी मंजूर केली आहे. न्यायमूर्ती एस. विमला देवी आणि न्यायमूर्ती टी.कृष्णा वल्ली यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.
तिरुनेलवेल्लीच्या पलयकोट्टई सेंट्रल जेलमधील कैदी सिद्दीकी अलीच्या पत्नीने यासंदर्भात एक याचिका मद्रास हायकोर्टात दाखल केली होती. या याचिकेतून तिने आपल्या पतीला दोन आठवड्यांसाठी मुक्तता करावी, अशी मागणी केली होती. यावर निर्णय देताना, कोर्टानं म्हटलं की, “कैद्यांना अपत्य प्राप्तीसाठी त्यांच्या जोडीदारांसोबत राहण्याचा अधिकार आहे. त्यासाठी सरकाने एक समिती स्थापून यावर गांभिर्याने विचार करावा.”
“अनेक देशांमध्ये कैद्यांना अशा कारणांसाठी सुट्टी दिली जाते. केंद्रानेही अपत्य प्राप्तीचा प्रत्येकाला अधिकार असल्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे कैद्यांनाही आपली इच्छा पूर्ण करण्याचा अधिकार आहे. तेव्हा सरकारने यावर उपाय शोधण्यासाठी प्रयत्न करावेत,” अशी अपेक्षाही कोर्टाने व्यक्त केली.
“कुटुंब नियोजनामुळे दोघांमधील संबंध अधिक दृढ होतात. गुन्हेगारी प्रवृत्ती कमी होण्यास मदत मिळते, तसेच यातून कैद्यांनाही नवीन जीवन जगण्याची वेगळी प्रेरणा मिळते. कैद्यांना सुधारण्याची संधी देणं, हा आपल्या व्यवस्थेचा भाग आहे. त्यामुळे त्यांना तशी संधी दिली पाहिजे,” असंही कोर्टाने पुढं नमुद केलं आहे.
दरम्यान, कैद्याची सुट्टी मंजूर झाल्यानंतर, त्याच्या वैद्यकीय तपासणीसाठी दोन आठवड्याची अतिरिक्त सुट्टी देण्यावरही विचार होऊ शकतो. त्यामुळे जेल अधिकाऱ्यांनी नियमांचे पालन करावे, आणि संबंधित कैद्याच्या सुट्टीच्या काळात, त्याला संरक्षण द्यावे, अशा सूचनाही कोर्टाने कारागृह अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement