अंतिम सत्र वगळून लॉ अभ्यासक्रमाच्या इतर परीक्षा रद्द; बार कौन्सिल ऑफ इंडियाचा निर्णय
अंतिम सत्र वगळता लॉ अभ्यासक्रमाच्या इतर वर्षांच्या परिक्षा रद्द करण्याच्या सूचना बार कौन्सिल ऑफ इंडियाने महविद्यालयं आणि विद्यापीठांना दिल्या आहेत.
नवी दिल्ली : बार कौन्सिल ऑफ इंडियाने लॉ विद्यार्थ्यांच्या बाबतीत एक पत्रक काढून मोठा निर्णय घेतला आहे. एलएलबी (3 वर्ष ), एलएलबी (5 वर्ष) अभ्यासक्रमासाठी यंदाच्यावर्षी अंतिम वर्षाच्या परीक्षा या घेतल्या जाणार असून त्यासाठी ऑनलाइनसोबत इतर पर्यायांचा विचार देशभरातील विद्यापीठांनी करण्याच्या सूचना या पत्रकात केल्या आहेत. लॉ अंतिम वर्ष सोडून इतर वर्गातील विद्यार्थ्यांच्या यावर्षी परीक्षा न घेता, त्यांना पुढील वर्गात प्रोमोट करावे. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर जेव्हा महाविद्यालय, विद्यापीठ सुरु होतील, तेव्हा या वर्गाच्या परीक्षा घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे अंतिम वर्षाचे विद्यार्थी सोडून इतर वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मागील वर्ष आणि या वर्षीच्या गुणांचा विचार करून पुढील वर्गासाठी प्रोमोट केलं जाणार आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता बार कौन्सिल ऑफ इंडियाने काही दिवस वाट पाहिली, त्यानंतरही कोरोनाचा संसर्ग कमी होत नाही, हे लक्षात आल्यानंतर हा निर्णय परिपत्रक काढून जाहीर केला आहे. त्यामुळे लॉ अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे लॉ शिक्षण घेणाऱ्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा घेण्यात येईल. शिवाय, ज्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षी सर्व पेपरमध्ये पास झालेले नाहीत, त्यांना सप्लिमेंट्री परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यामुळे अंतिम वर्षाची परीक्षा देणारे आणि सप्लिमेंट्री परीक्षा देणारे विद्यार्थी या दोन्ही श्रेणीमधील विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा द्यावी लागणार आहे. तसेच प्रोजेक्ट रिपोर्ट, रिसर्च पेपर सबमिट करावे लागणार आहेत. लॉचे शिक्षण देणाऱ्या विद्यापीठांना या पत्रात सांगितल्याप्रमाणे, परीक्षांबाबत पर्याय देत स्वतंत्रपणे ज्याप्रकारे परीक्षा घेता येऊ शकते त्यानुसार परीक्षा घ्यावी, अशा सूचना बार कौन्सिल ऑफ इंडियाने दिल्या आहेत.
बार कौन्सिल ऑफ इंडियाने विद्यापीठांनासुद्धा निर्देश देत कोविड-19 च्या बाबतीत सर्व मार्गदर्शन तत्वांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. बार कौन्सिल ऑफ इंडियाने या पत्रात सांगितले आहे की, 'विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होणार नाही, याबाबत लक्ष देण्यात यावे. सोशल डिस्टंन्सिंगचं पालन करावं, वेळोवेळी वर्गखोल्या सॅनिटाइज केल्या जाव्यात.', अशा सूचना बार कौन्सिल ऑफ इंडियाकडून सूचना परिपत्रक काढून देण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI