Lata Mangeshkar Birthday : एक सामान्य मुलगी ते देशाचा आवाज, लतादिदींचा अनोखा प्रवास
Happy Birthday Lata Mangeshkar : भारताचा आवाज अशी ओळख असलेल्या गाणकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस. बॉलिवूडसह देशविदेशातील विविध भाषांतील गाण्यांना आपल्या मोहक आवाजाने स्वरबद्ध करणाऱ्या लतादिदी आज 91 वर्षांच्या झाल्या आहेत.
मुंबई : भारताचा आवाज अशी ओळख असलेल्या गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस. बॉलिवूडसह देशविदेशातील विविध भाषांतील गाण्यांना आपल्या मोहक आवाजाने स्वरबद्ध करणाऱ्या लतादिदी आज 91 वर्षांच्या झाल्या आहेत. वाढदिवसानिमित्त आज त्यांच्यावर बॉलिवूड, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. गायनाच्या क्षेत्रात अमूल्य योगदान दिल्याबद्दल त्यांना भारत रत्न, पद्म विभूषण, पद्म भूषण आणि दादासाहेब फाळके अवार्ड सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे.
लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 मध्ये झाला. लता मंगेशकरांचे कुटुंब संगीतासाठी प्रसिद्ध असून, सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते. लता मंगेशकर अर्थात लतादिदींनी आपल्या जादुई आवाजाच्या जोरावर 'गानकोकिळा' अशी बिरुदावली आपल्या नावासमोर मिळवली.
लता मंगेशकरांच्या कारकिर्दीची सुरुवात 1942 मध्ये झाली आणि ती कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून आहे. त्यांनी हजारहून अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली आहेत. तर अनेक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये देखील गायन केले आहे. 2001 साली त्यांना 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या नावे गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये देखील विक्रम नोंदलेले आहेत. 1974 ते 1991 च्या कालावधीत सर्वात जास्त रेकॉर्डिंग्सचा विक्रम त्यांनी केला.
मंगेशकर कुटंबाचा संगीताचा वारसा
लता मंगेशकरांचा जन्म मध्य प्रदेशातील इंदूर शहरात झाला. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक तसेच नाट्यकलावंत होते. लता दिदी या आपल्या बांधवांमध्ये सर्वात मोठ्या. आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ ही त्यांची लहान भावंडे. लता दिदींना पहिले संगीताचे धडे आपल्या वडिलांकडूनच मिळाले. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बाल-कलाकार म्हणून कामाची सुरुवात केली. 1942 मध्ये लता दिदी अवघ्या 13 वर्षांच्या असताना त्यांचे वडील हृदयविकाराच्या झटक्याने वारले होते. त्यानंतर लता मंगेशकर यांनी आपली वेगळी ओळख निर्माण करत हिंदी, मराठीसह अनेक भाषांमध्ये रसिकांच्या मनावर आपले नाव कोरले.
एबीपी माझा डिजिटलकडून भारतरत्न लता मंगेशकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा...!