(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus Cases : गेल्या 24 तासात देशात 13 हजार 405 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 235 जणांचा मृत्यू
दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या 24 तासात देशात 13 हजार 405 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोनाचा धोका कमी होत आहे. कारण दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या 24 तासात देशात 13 हजार 405 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर कोरोनामुळे मागील 24 तासात 235 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. कालच्या तुलनेत आज कोरोना रुग्णांमध्ये कमालीची घट झाली आहे. काल देशात 19 हजार 968 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. मागच्या 24 तासात 37 हजार 901 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.
सक्रिय रुग्णांची संख्या घटली
कोरोना रुग्णांची संख्या कमी कमी होत आहे. त्यामुळे कोरोनाचे असणारे संकट आता दूर होताना दिसत आहे. सध्या सक्रिय रुग्णांच्या संख्येत देखील घट झाली आहे. देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ही 1 लाख 81 हजार 75 झाली आहे. तर या कोरोनाच्या महामारीमध्ये आत्तापर्यंत 5 लाख 12 हजार 344 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत 4 कोटी 21 लाख 58 हजार 10 रुग्ण कोरोनातून बरे झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
दरम्यान, संपूर्ण देशासह महाराष्ट्रात कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात कोरोनाच्या 806 नव्या रुग्णांची भर पडली आहे. राज्यात आज चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर, राज्यात गेल्या 24 तासांत 2 हजार 696 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. काल (सोमवारी) राज्यातील नऊ महानगरपालिकांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही तर 32 महानगपालिकांमध्ये कोरोनाबाधितांच्या एकेरी संख्येची नोंद झाली आहे. तर 58 महानरपालिकांमध्ये कोरोनाचा एकही मृत्यू झालेला नाही.
दिल्लीत 360 नवीन रुग्ण
सोमवारी दिल्लीत कोरोनाचे 360 नवीन रुग्ण आढळून आले. तर चार रुग्णांचा मृत्यू झाला. राष्ट्रीय राजधानीत 28 डिसेंबर 2021 नंतर प्रथमच, संसर्ग दर एक टक्क्याच्या खाली आला आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 706 रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत. दिल्लीमध्ये कोविड प्रकरणांची एकूण संख्या 18 लाख 56 लाख 511 वर पोहोचली आहे. तर आत्तापर्यंत 26,105 लोकांनी आपला जीव गमावला आहे.
आतापर्यंत सुमारे 175 कोटी डोस
सध्या देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण सरू आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशात लसीचे सुमारे 175 कोटी डोस देण्यात आले आहेत. काल 35 लाख 50 हजार 868 डोस देण्यात आले. त्यानंतर आतापर्यंत 175 कोटी 83 लाख 27 हजार 441 लसीचे डोस डोस देण्यात आले आहेत.