खुशबू सुंदर यांनी काँग्रेसचा हात सोडला, भाजपमध्ये प्रवेश
काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या खुशबू सुंदर यांनी काँग्रेसला रामराम करुन भाजपमध्ये प्रवेश केला. मागील काही काळापासून त्या पक्षनेतृत्त्वावर नाराज होत्या. चाहत्यांनी 90च्या दशकात खुशबू सुंदर यांचं मंदिर बनवलं होतं

नवी दिल्ली : अभिनेत्री ते राजकारणी असा प्रवास करणाऱ्या खुशबू सुंदर यांनी सोमवारी (12 ऑक्टोबर) भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा आणि इतर सदस्यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजप पक्षाचं सदस्यत्व स्वीकारलं. "काळानुसार मला जाणवलं की देशाला योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या व्यक्तीची आवश्यकता आहे,ठ असं खुशबू सुंदर यांनी पक्षप्रवेश केल्यानंतर म्हटलं.
बऱ्याच दिवसांपासून खुशबू सुंदर काही मुद्द्यांवरुन काँग्रेसच्या अधिकृत भूमिकेच्या विरुद्ध मत मांडत होत्या. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने खुशबू सुंदर पक्षनेतृत्त्वावर नाराज होत्या असं म्हटलं जातं. काही महिन्यांपूर्वी त्यांनी पक्षाच्या भूमिकेच्याविरोधात जाऊन नव्या शैक्षणिक धोरणाचं समर्थन केलं होतं.
काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांवर गंभीर आरोप राहुल गांधी यांच्या निकटवर्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खुशबू सुंदर यांनी सोमवारी सकाळीच काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पाठवलेल्या राजीनाम्यात त्यांनी कोणाचंही नाव न घेता पक्षाच्या मोठ्या नेत्यांवर आरोप केले होते. "पक्षात मोठ्या पदावर बसलेले काही लोक असे आहेत त्यांचा ग्राऊंड लेव्हलशी काहीही संबंध नाही. ते आदेश देत आहेत. माझ्यासारख्या लोकांना, ज्यांना पक्षासाठी काम करायचं आहे त्यांना मागे ढकलत आहेत आणि रोखत आहेत," असं त्यांनी आपल्या राजीनाम्याच्या पत्रात लिहिलं आहे.
2014 मध्ये खुशबू सुंदर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश खुशबू सुंदर यांना राजकारणात आणण्याचं श्रेय द्रमुकचे नेते एम करुणानिधी यांना जातं. 2010 मध्ये त्यांनी खुशबू सुंदर यांना आपल्या पक्षात घेतलं होतं. 50 वर्षीय खुशबू सुंदर यांनी 2014 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की, "काँग्रेसच एकमेव असा पक्ष आहे, जो भारतीय जनतेचं भलं आणि देश एकजूट करु शकतो."
काँग्रेसने खुशबू सुंदर यांची प्रवक्तेपदी निवड केली. परंतु लोकसभेसाठी उमेदवारी दिली नाही किंवा राज्यसभेतही पाठवलं नाही. यामुळेच त्या नाराज होत्या अशी चर्चा आहे.
बॉलिवूडमधून सुरुवात, दाक्षिणात्य सिनेसृष्टीत यश 50 वर्षीय खुशबू सुंदर यांचा जन्म मुंबईत झाला होता. त्यांचं खरं नाव नखत खान आहे. हिंदी चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या खुशबू सुंदर यांचा पहिला चित्रपट 1980 मध्ये प्रदर्शित झालेला 'द बर्निंग ट्रेन' हा होता. यानंतर 'लावारिस' (1981), 'कालिया' (1981), 'नसीब' (1981), 'बेमिसाल' (1982), 'मेरी जंग' (1985), 'तन बदन' (1986) और 'दीवाना मुझसा नहीं' (1990) यांसारख्या चित्रपटांमध्ये त्या झळकल्या होत्या. मात्र बॉलिवूडमध्ये त्यांना फारसं यश न मिळाल्याने त्यांनी 1986 मध्ये तामीळ चित्रपटांकडे मोर्चा वळवला. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत त्यांनी जवळपास 200 चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
पहिल्या भारतीय अभिनेत्री ज्यांचं मंदिर बनलं खुशबू सुंदर या भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या अभिनेत्री आहेत, ज्यांच्या चाहत्यांनी त्याचं मंदिर बनवलं आहे. 1990 च्या दशकात कलाकारांचं मंदिर बनवण्याचा जणू ट्रेण्डच निर्माण झाला होता. पण हे कलाकार पुरुषच असायचे. त्यावेळी खुशबू सुंदर यांच्या चाहत्यांनी त्यांचं मंदिर बनवून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. हे मंदिर तामिळनाडूच्या तिरुचिरापल्लीमध्ये आहे.























