105 मुलं दगावलेल्या 'त्या' रुग्णालयाची पाहाणी करायला आलेल्या आरोग्यमंत्र्यासाठी गालिचे अंथरले
राजस्थानमधल्या कोटा येथील जे. के. लोन या हॉस्पिटलमध्ये गेल्या दोन दिवसांत 13 बालकांचा मृत्यू झाला आहे. त्याआधीही 23-24 डिसेंबर या दोन दिवसांत येथे दहा बालकं दगावली होती. महिन्याभरात आतापर्यंत 105 बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
जयपूर : देशात मृत्यू इतका स्वस्त झालाय की त्याला रस्ते, लोकल, चेंगराचेंगरी अस कुठलंही कारण त्याला पुरेसं आहे. शिवाय यात निर्ढावलेल्या व्यवस्थेकडून वयोगटाचाही कुठला भेद दिसत नाही. राजस्थानमध्ये एका महिन्यात तब्बल 105 बालकांचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे.
राजस्थानमधल्या कोटा येथील जे. के. लोन या हॉस्पिटलमध्ये गेल्या दोन दिवसांत 13 बालकांचा मृत्यू झाला आहे. त्याआधीही 23-24 डिसेंबर या दोन दिवसांत येथे दहा बालकं दगावली होती. महिन्याभरात आतापर्यंत 105 बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
105 बालकांचा मृत्यू झाल्यानंतर अखेर राजस्थान सरकारला जाग आली आहे. आज राजस्थानचे आरोग्य मंत्री रघू शर्मा जे. के. लोन रुग्णालयात पोहोचून घटनेची माहिती घेणार होते. परंतु मंत्री पोहोचण्यापूर्वीच रुग्णालय प्रशासनाने रुग्णालयात प्रवेशद्वारापासून वॉर्डपर्यंत कारपेट (गालिचा) अंथरला होता. परंतु माध्यमांनी त्याचे चित्रीकरण सुरु केल्यानंतर गडबडीत गालिचा हटवण्यात आला.
रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले की, मंत्र्यांसाठी गालिचे अंथरुन आणि तात्पुरतं काम करुन रुग्णालय प्रशासन मंत्र्यांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम करत आहे. आरोग्य मंत्र्यांना सर्व परिस्थिती ठिक असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आरोग्य मंत्री रघू शर्मा यांची फसवणूक करण्यासाठी रुग्णालय प्रशासन काल रात्रीपासूनच कामाला लागलं आहे. रुग्णालयाचे रंगरुप पालटण्याचा प्रयत्न सुरु केला. रुग्णालयातील सर्व वॉर्डची सफाई सुरु केली. सर्व बेडवर नव्या चादरी अंथरल्या. विशेष म्हणजे एरवी स्वतःच्या मर्जीनुसार कधीही रुग्णालयात येणारे डॉक्टर सकाळी 8 च्या आधीच रुग्णालयात दाखल झाले होते.
दरम्यान, प्रसुतीनंतर महिलांना ज्या वॉर्डमध्ये ठेवले जाते, तिथे गेल्या काही दिवसांपासून विजेचा दिवा नव्हता. परंतु आज सकाळीच त्या वॉर्डमध्ये दिवा बसवण्यात आला. सकाळी-सकाळी सर्व खिडक्यांना जाळ्या आणि पडदे लावण्यात आले.