Sadiq Ali Case : पक्षात फूट पडल्यानंतर वारंवार चर्चेत येणारा सादिक अली खटला आहे तरी काय?
What is Sadiq Ali Case : निवडणूक आयोगासमोर पक्षावर दावा सांगताना सादिक अली प्रकरणाचा दाखल दिला जातो. हा खटला नेमका आहे तरी काय?
Explainer Sadiq Ali Case : राजकीय पक्षात फूट पडल्यानंतर दोन्ही गटांकडून पक्षावर दावा केला जातो. आमचाच पक्ष खरा, आम्हालाच सर्वाधिक पाठिंबा असल्याचा दावा पक्षावर दावा सांगणाऱ्या गटाकड़ून केला जातो. केंद्रीय निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत पक्षावर दावा करताना सादिक अली (Sadiq Ali Case) प्रकरणाचा दाखला देण्यात येतो. सादिक अली खटला नेमका आहे तरी काय, हे जाणून घ्या...
सादिक अली खटल्याची पार्श्वभूमी
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पश्चात काँग्रेस पक्षातील गटबाजी दिसू लागली होती. नेहरू यांच्यानंतर पंतप्रधानपदाची सूत्रे लालबहाद्दूर शास्त्री यांच्या हाती गेली. मात्र, शास्त्री यांच्या निधनानंतर एका गटाने इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांना नेतृत्वासाठी पुढे आणले. 1967 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला यश मिळाले. मात्र, या निवडणुकीत विरोधी पक्षाची कामगिरी लक्षणीय होती.
काँग्रेसमध्ये फूट
इंदिरा गांधी यांना पंतप्रधानपदी बसवणाऱ्या सिंडिकेट गटामध्ये (Congress Syndicate) इंदिरा यांच्याविरोधात नाराजी पसरू लागली होती. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद उफाळून आले. सिंडिकेट गटाने नीलम संजीव रेड्डींना काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी दिली. तर, इंदिरा गांधी यांनी उपराष्ट्रपती व्ही.व्ही. गिरी यांना अपक्ष म्हणून उमेदवारी दिली आणि व्ही. व्ही. गिरी यांना निवडून आणले.
या घटनेमुळे काँग्रेसमध्ये फूट पडली. काँग्रेस इंदिरा आणि काँग्रेस सिंडिकेट असे दोन गट झाले. या वादामुळे काँग्रेसचे निवडणूक चिन्ह बैलजोडी कोणाला द्यायचे असा वाद निर्माण झाला होता. हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहचला.
सर्वोच्च न्यायालयात काँग्रेस पक्ष संघटनेचे अध्यक्ष सादिक अली आणि इंदिरा गांधी यांच्या वर्चस्वाखालील संसदीय पक्ष असा खटला होता. या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने इंदिरा गांधी यांच्या नेतृत्त्वातील पक्ष खरा असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यामुळे इंदिरा गांधी यांच्या गटाला गाय आणि वासरू हे चिन्ह देण्यात आले. या खटल्यात इंदिरा गांधी यांच्या बाजूने अधिक संख्याबळ असल्याचा मुद्दा लक्षात घेण्यात आला होता.
निवडणूक आयोगाच्या 1968 च्या चिन्हाबाबतच्या आदेशानुसार, एखाद्या पक्षात फूट पडली असल्याचे निवडणूक आयोगाच्या लक्षात आल्यानंतर निवडणूक आयोग विविध माहिती जमा करते. मूळ पक्ष कोणता याचा निर्णय घेताना संसदेतील संख्याबळ, त्यातील बहुमताचा आकडा हा महत्त्वाचा ठरतो.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर पक्षावर आणि चिन्हावर दावा केला होता. या सुनावणीतही आमदार, खासदारांची संख्या निर्णायक ठरली असल्याचे निवडणूक आयोगाच्या आदेशातून दिसून आली.
इंदिरा गांधींना आव्हान देणारे सादिक अली कोणे होते? (Who is Sadiq Ali)
सादिक अली हे मूळचे स्वातंत्र्यसैनिक होते. विद्यार्थी दशेपासून ते स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होते. काँग्रेसमध्ये सादिक अली सक्रिय होते. काँग्रेसमध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. सादिक अली हे 1971-1973 या कालावधीत ही ते काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होते.