Karnataka News : मुस्लिम फळ विक्रेत्यांच्या दुकानांची कर्नाटकमध्ये तोडफोड, धार्मिक स्थळांजवळून बाहेर काढण्याचे प्रयत्न
श्री राम सेनेच्या कार्यकर्त्यांनी मुस्लिम फळ विक्रेत्यांची दुकानांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी श्री राम सेनेच्या चार जणांना अटक करण्यात आली आहे.
Karnataka News : कर्नाटकमधील धारवाड जिल्ह्यातील एका मंदिरात श्री राम सेनेच्या कार्यकर्त्यांनी मुस्लिम फळ विक्रेत्यांच्या दुकानांची तोडफोड केल्याची घटना घडली. तसेच मुस्लिम फळ विक्रेत्यांची फळे रस्त्यावर फेकून देण्यात आली आहेत. या प्रकरणी कर्नाटक पोलिसांनी श्री राम सेनेच्या चार जणांना अटक केली आहे. चिदानंद कलाल, कुमार कट्टीमणी, मैलारप्पा गुडप्पनवर आणि महालिंगा एगली अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
धारवाड ग्रामीण पोलिसांनी जाणूनबुजून धार्मिक भावना दुखावल्याबद्दल, बेकायदेशीर सभा, दंगल आणि शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 8 जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नुगेकेरी हनुमान मंदिराच्या प्रांगणात नबीसाब यांचे 15 वर्षांपासून दुकान आहे. प्रत्यक्षात 9 एप्रिल रोजी मंदिर परिसरात आलेल्या कामगारांनी फळांची नासधूस करुन व्यवसाय सुरू ठेवू नका, असा सल्ला दिला होता. तरीही दुकान सुरु असल्याने राम सेनेशी संबंधित कार्यकर्त्यांनी त्यांच्या फळाची नासधूस केली. दरम्यान, याबाबत राज्याचे कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री जेसी मधु स्वामी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. गैर-हिंदू लोक मंदिर परिसरात आणि धार्मिक मेळ्यांमध्ये व्यवसाय करु शकत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मुस्लिम विक्रेत्यांना धार्मिक स्थळांजवळून बाहेर काढण्याचे प्रयत्न
राज्याचे कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री जेसी मधु स्वामी यांनी सभागृहात सांगितले की, गैर-हिंदू लोक मंदिर परिसरात आणि धार्मिक मेळ्यांमध्ये त्यांचा व्यवसाय करु शकत नाहीत. तेव्हापासून हिंदुत्ववादी गट मुस्लिम विक्रेत्यांना सर्व धार्मिक स्थळांमधून बाहेर काढण्याची जोरदार मागणी करत आहेत. फळांच्या दुकानाच्या तोडफोडीचा सर्वांनी निषेध केला आहे. माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी विक्रेत्याला आर्थिक मदतही केली आहे.
राज्यात हिजाब, हलाल वादानंतर मंदिरासमोरील मुस्लिम व्यापाऱ्यांच्या दुकानाची तोडफोड झाल्याची घटना घडली आहे. या घटना पाहता गेल्या काही दिवसांपासून राज्यात जातीय घटनांमध्ये वाढ झाली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्याचवेळी कर्नाटकातील वाढत्या जातीय घटना आणि तणावामुळे विरोधकांनी आता सरकारविरोधात टीका करण्यास सुरुवात केली आहे.