(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोरोनासदृश लक्षणांमुळे ज्योतिरादित्य शिंदे हॉस्पिटलमध्ये दाखल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही कोरोनाची चाचणी केलेली आहे. दोन दिवसांपासून त्यांना कोरोनासदृश लक्षणं जाणवत होती. त्यांच्या टेस्टचा रिपोर्टही अजून येणं बाकी आहे.
दिल्ली : भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या मातोश्री माधवीराजे यांना कोरोना सदृश लक्षणं आढळल्यानं दिल्लीतल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सोमवारी म्हणजे 8 जूनला दोघांची कोरोना टेस्टही करण्यात आली आहे. मात्र अद्याप त्यांचे रिपोर्ट आलेले नाहीत.
दिल्लीतल्या साकेत परिसरातल्या मॅक्स सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटलमध्ये ज्योतिरादित्य आणि त्यांच्या मातोश्री यांना दाखल करण्यात आलं. रविवारपासूनच दोघांची तब्येत काहीशी बिघडली होती. घशात खवखव आणि ताप आल्यानं त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. काही माध्यमांमध्ये या दोघांचे कोरोनो रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याच्याही बातम्या आल्या आहेत. पण ज्योतिरादित्य यांच्या निकटच्या वर्तुळातून मात्र अद्याप टेस्टचा रिपोर्ट आला नसल्याचं सांगितलं जात आहे. हॉस्पिटल प्रशासनाकडूनही त्यांच्या आरोग्याबाबत अद्याप कुठलं अधिकृत वक्तव्य करण्यात आलेलं नाहीय.
सध्या दोघांच्याही प्रकृतीत सुधारणा होत असून दोघेही ठीक आहेत असंही सांगण्यात येतंय. मार्च महिन्यातच काँग्रेसची साथ सोडून ज्योतिरादित्य शिंदे हे भाजपमध्ये दाखल झाले होते. त्यांना भाजपकडूनही राज्यसभेच्या निवडणुकीत उमेदवारीही जाहीर करण्यात आली. कोरोना संकटामुळे स्थगित झालेली ही निवडणूक 19 जून रोजी होणार आहे. दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी ज्योतिरादित्य आणि त्यांच्या मातोश्री लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी आपण ईश्वराकडे प्रार्थना करत असल्याचं ट्विट केलं आहे.
ज्योतिरादित्य सिंधिया जी व आदरणीय राजमाता साहब के शीघ्र स्वास्थ्य लाभ की प्रभु से प्रार्थना करता हूँ। https://t.co/g7qp3R8lFw
— digvijaya singh (@digvijaya_28) June 9, 2020
आजच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही कोरोनाची चाचणी केलेली आहे. दोन दिवसांपासून त्यांना कोरोनासदृश लक्षणं जाणवत होती. त्यांच्या टेस्टचा रिपोर्टही अजून येणं बाकी आहे.
संबंधित बातम्या :