Jharkhand Election Results 2019: रांची : झारखंडच्या नागरिकांनी भाजपला नाकारत काँग्रेस आघाडीला स्पष्ट बहुमत दिलं आहे. त्यामुळे भाजपच्या हातून महाराष्ट्र पाठोपाठ झारखंडही निसटलेलं आहे. झारखंडमध्ये काँग्रेस आघाडीला 46 जागा मिळाल्या असून भाजपला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. काँग्रेस आघाडीत झारखंड मुक्ती मोर्चाला 28 जागा मिळाल्या असून काँग्रेसला 16 जागा मिळाल्या आहेत. झारखंडमध्ये 81 जागांवर मतदान झालं होतं. प्रचारात सत्ताधारी भाजप विरुद्ध झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेस-राष्ट्रीय जनता दल यांच्या आघाडीत सरळ सामना झाला. बहुमतासाठी लागणारा 41 आकडा असून काँग्रेस आघाडीनं 46 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे काँग्रेस आघाडीचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.


स्थापनेपासून झारखंडला अस्थिर सरकारचा शाप होता, गेल्या 14 वर्षात या राज्याने 8 मुख्यमंत्री पाहिले आहेत. 81 जागा असलेल्या झारखंड विधानसभेत बहुमताला 41 जागा लागतात. 2014 साली पहिल्यांदाच भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे, ऑल झारखंड स्टुडंट युनियन म्हणजेच, आजसूला सोबत घेऊन आणि नंतर झारखंड विकास मोर्चा फोडून भाजपने स्थिर सरकार दिलं होतं. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या शक्तीशाली असलेल्या मराठा समाजाचा मुख्यमंत्री न देता जातीय समीकरणात न बसणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनवलं तसंच आदिवासीबहुल झारखंडमध्ये बिगर आदिवासी मुख्यमंत्री देण्याचा प्रयोग भाजपने केला. भाजपचे रघुबर दास हे पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारे झारखंडचे पहिले मुख्यमंत्री ठरले. मात्र पाच वर्षात हळुहळू पक्षांतर्गत वाद, धोरणातील चुकलेले निर्णय,स्थानिक पातळीवरील मुद्द्यांकडे झालेलं दुर्लक्ष, मोदीशाहांवर अति अवलंबून राहणं, पक्षातील जुन्याजाणत्या नेत्यांची उपेक्षा आणि आयारामांना मान अशा महाराष्ट्राप्रमाणेच घटना घडत गेल्या महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये इतकं साम्य की रघुबर दास यांनी आपल्या मर्जीप्रमाणे तिकीट वाटप केल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला.

महाराष्ट्रात ज्याप्रमाणे खडसे, तावडे, बावनकुळे अशा जुन्या नेत्यांची तिकीटं कापली त्याचप्रमाणे झारखंडमध्येही 37 पैकी 13 आमदारांना भाजपने तिकीट नाकारलं ज्यात सरयू राय यांच्यासारख्या अत्यंत अनुभवी आणि स्वच्छ प्रतिमा असणाऱ्या नेत्याचा समावेश होता. सरयू राय म्हणजे, 1962 पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवक. भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते. झारखंडमधील भ्रष्टाचार विरोधी चेहरा, राय यांच्यामुळे किमान तीन घोटाळे उघडकीस आले आणि जगन्नाथ मिश्रा, लालुप्रसाद यादव आणि मधु कोडा या तीन माजी मुख्यंमत्र्यांना तुरुंगाची हवा खावी लागली यावरुन त्यांच्या लढ्याचं महत्वं लक्षात येईल.

एका वर्षात पाच राज्यांतील गमावली सत्ता

गेल्या वर्षीपर्यंत देशातील दोन तृतीयांश राज्यांमध्ये भाजपची सत्ता होती. मात्र गेल्या वर्षीपासून भाजपने अनेक राज्यातील आपली सत्ता गमावली आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपने महाराष्ट्रातील सत्ता गमावली होती. गेल्यावर्षीपर्यंत भाजपची 21 राज्यांमध्ये सत्ता होती, मात्र सध्या 15 राज्यात सत्ता उरली आहे. राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या राज्यात डिसेंबर 2018 मध्ये निवडणुका पार पडल्या होत्या. या निवडणुकीत भाजपला तिन्ही राज्यातून पायउतार व्हावं लागलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रातील सत्ताही भाजपच्या हातून निसटली. हरियाणामध्येही भाजपला एकहाती सत्ता काबीज करण्यात अपयश आलं. शेवटी जननायक जनता पक्षासोबत युती करुन भाजप हरियाणात सत्तेत सहभागी झाला.

2014 निवडणुकांचे निकाल :

भाजप : 37

आजसू : 5

जेव्हिएम : 8

जेएमएम : 19

काँग्रेस : 6

अन्य : 6

संबंधित बातम्या : 

भाजपसाठी धोक्याची घंटा... एका वर्षात पाच राज्यांतील गमावली सत्ता

Jharkhand Election Results 2019 | महाराष्ट्रापाठोपाठ झारखंडही भाजपकडून निसटलं, काँग्रेस-जेएमएमचं सरकार निश्चित

Jharkhand Election Results 2019: दोन राज्य एक निकाल