Jharkhand Election Results 2019: रांची : झारखंड विधानसभा निवडणुकीचे निकाल आता जवळपास स्पष्ट झाले आहेत. भाजपने झारखंडमधील सत्ता गमावली असल्याचं चित्र दिसून येत आहे. गेल्या वर्षीपर्यंत देशातील दोन तृतीयांश राज्यांमध्ये भाजपची सत्ता होती. मात्र गेल्या वर्षीपासून भाजपने अनेक राज्यातील आपली सत्ता गमावली आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपने महाराष्ट्रातील सत्ता गमावली होती. गेल्यावर्षीपर्यंत भाजपची 21 राज्यांमध्ये सत्ता होती, मात्र सध्या 15 राज्यात सत्ता उरली आहे.


राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या राज्यात डिसेंबर 2018 मध्ये निवडणुका पार पडल्या होत्या. या निवडणुकीत भाजपला तिन्ही राज्यातून पायउतार व्हावं लागलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रातील सत्ताही भाजपच्या हातून निसटली. हरियाणामध्येही भाजपला एकहाती सत्ता काबीज करण्यात अपयश आलं. शेवटी जननायक जनता पक्षासोबत युती करुन भाजप हरियाणात सत्तेत सहभागी झाला.

झारखंडमध्ये भाजप सत्तेपासून दूर

आता झारखंडही भाजपच्या हातातून जाताना दिसत आहे. झारखंडच्या जनतेने भाजपच्या रघुवर दास यांना नाकारल्याचे चित्र दिसत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार, काँग्रेस-जेएमएम आणि राजद या महाआघाडीला जनतेनं कौल दिल्याचे दिसून येत असून यांची वाटचाल बहुमताच्या दिशेने होत असल्याचे दिसून येत आहे. मागील सात महिन्यांमध्ये भाजपसाठी हा मोठा धक्का आहे.

झारखंडमध्ये असा आहे मतदारांचा कल :

महाराष्ट्रात सत्तेतून बाहेर राहिल्यानंतर आता झारखंडमध्येही भाजपला मोठा झटका बसल्याचं दिसत आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या सर्व 81 जागांचे कल हाती आहेत. यामध्ये झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम), काँग्रेस आणि राजद यांची सरकार येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. काँग्रेस, जेएमएम आणि राजद आघाडीला 42 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर यंदा स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला भाजप पक्ष 28 जागांवर आघाडीवर आहे. याशिवाय आजसूला 3, झारखंड विकास मोर्चा 4 आणि इतरांना 4 जागांवर आघाडी मिळाली आहे.

एक्झिट पोलमध्ये महाआघाडीच्या विजयाचा अंदाज

दरम्यान मतदानानंतर झालेल्या एक्झिट पोलमध्ये वर्तवलेला अंदाज खरा ठरत असल्याचं चित्र कलांमध्ये दिसत आहे. बहुतांश एक्झिट पोलमध्ये काँग्रेस-जेएमएम आणि राजदला बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर एबीपी आणि सीवोटरच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला 32, महाआघाडी 35, जेव्हीएम 3 आणि आजसू 5 आणि इतर 6 जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती.

संबंधित बातम्या :

Jharkhand Election Results 2019 | महाराष्ट्रापाठोपाठ झारखंडही भाजपकडून निसटलं, काँग्रेस-जेएमएमचं सरकार निश्चित

Jharkhand Election Results 2019: दोन राज्य एक निकाल