नवी दिल्ली : नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाचं कायद्यात रूपांतर झाल्यापासूनच देशभरात आंदोलन केली जात आहेत. अनेक ठिकाणी कायद्याविरोधातील आंदोलनांनी हिंसक वळण घेतलं असून सर्व पातळ्यांवरून या कायद्याविरोधात निषेध व्यक्त करण्यात येत आहे. अशातच काँग्रेसने आज राजघाटावर आंदोलन केलं. यावेळी काँगेस अध्यक्षा सोनिया गांधी, मनमोहन सिंह आणि राहुल गांधी यांनी संविधानाची प्रस्तावना वाचून दाखवली. दरम्यान, काँग्रेसने नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाला 'असंविधानिक' म्हणत, या कायद्याला कडाडून विरोध केला. पक्षाच्या सचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी शनिवारी बोलताना सांगितले की, CAA आणि NRC कायदा हा संविधानाच्या विरोधात आहे. जनतेचा आवाज दाबण्यासाठी सरकारकडून एकाधिकारशाही अवलंब होत आहे. प्रियंका गांधी यांनी हा आरोपही केला की, नागरिकत्व दुरूस्ती कायदा आणि एनआरसीच्या नावाने गरिबांवर अत्याचार करण्यात येत आहे. तसेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मध्य प्रदेशमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू केली जाणार नसल्याची घोषणा केली. कांग्रेस नेते वेणुगोपाल यांनी बोलताना सांगितले की, आज महात्मा गांधींच्या समधीस्थळावर आंदोलन करण्यात येत आहे. त्यांनी दावा केला की, केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने तरूणांवर आणि विद्यार्थांवर बलाचा प्रयोग केला, त्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनीही नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध केला. हा कायदा लोकशाहीसाठी धोका आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या कायद्यावरून देशवासियांची दिशाभूल करत आहेत. केंद्राचा अजेंडा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा आहे. अशी टीका गहलोत यांनी केली.