Jammu Twin Blast : जम्मू-काश्मीर स्फोटाचं गूढ उकललं; परफ्यूमच्या बॉटलमध्ये बॉम्ब, स्फोटामागे पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा हात
Jammu Twin Blast In Narwal : जम्मू पोलिसांनी लष्कर-ए-तैयबाच्या एका दहशतवाद्याला अटक केली आहे. हा दहशतवादी तीन वर्षांपासून पाकिस्तानातील हस्तकांच्या संपर्कात होता.
Jammu Twin Blast In Narwal : जम्मूतील (Jammu Blast) नरवाल भागात झालेल्या दोन बॉम्बस्फोटांच्या मुख्य सूत्रधाराला जम्मू पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून आयईडीही (IED) जप्त करण्यात आला आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या सांगण्यावरुन आरोपींनी हे स्फोट घडवून आणल्याची माहिती समोर आली आहे. कटरा बस स्फोटातही त्याचा हात होता. जम्मू पोलिसांनी आरोपी दहशतवादी आरिफला अटक केली आहे. पोलिसांकडून त्याच्या साथीदारांचा शोध सुरु आहे. पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी सांगितले की, नरवाल मंडीमध्ये 20 जानेवारीला दोन बॉम्ब स्फोट करण्यात आले. यामागे आरीफ हा मुख्य सूत्रधार होता.
दहशतवाद्याकडून परफ्यूम IED जप्त
जम्मूतील नरवाल भागात झालेल्या IED स्फोटाचे गूढ पोलिसांनी उकललं आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार रियासी येथील आरिफला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दहशतवादी आरीफकडून परफ्यूम इंप्रोवाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिवाईस (Improvised Explosive Device - IED) जप्त केले आहे. पोलीस महासंचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटामागे पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात आहे. त्यांना जम्मूमध्ये हस्तकांकडून स्फोट घडवून आणले. अटक करण्यात आलेला दहशतवादी आरीफ सरकारी शाळेत शिक्षक आहे.
'परफ्यूम आयईडी' म्हणजे काय?
हा बॉम्ब दिसायला परफ्यूम बॉटलसारखा दिसतो. पहिल्यांदा नजरेत आल्यावर ही परफ्यूमची बॉटल आहे, असे वाटते. पण यामध्ये सुंगधाव्यतिरिक्त स्फोटकं असतात. लष्कर-ए-तोयबा-दहशतवादी बनलेल्या एका अत्तराच्या बाटलीत बसवलेल्या IED बॉम्बसह दहशतवाद्याला अटक केली आहे.
आरोपी लष्कर-ए-तोएबाचा हस्तक
नरवाल भागात 21 जानेवारी रोजी, 20 मिनिटांच्या वेळेत दोन स्फोट झाले. पहिल्या IED स्फोटात नऊ जण जखमी झाले होते. पोलिसांच्या विशेष पथकाने कसून चौकशी केल्यानंतर दहशतवादी आरिफला अटक केली आहे. तीन वर्षांपासून तो पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या संपर्कात होता. आरिफ दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोएबाचा हस्तक आहे. पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांच्या सांगण्यावरुन आरिफने हे स्फोट घडवून आणले.
पोलीस महासंचालकांचा पाकिस्तानवर निशाणा
पोलीस महासंचालक सिंह यांनी आपल्या दहशतवादाचा प्रचार करण्यावरुन पाकिस्तानला लक्ष्य केले. "पाकिस्तान दहशतवादाचा प्रचार करण्यासाठी आणि जगभरात शेकडो निष्पाप लोकांची हत्या करण्याचं काम करत आहे. गेल्या काही काळापासून जम्मू-काश्मीरला पाकिस्तानने लक्ष्य केलं आहे. पाकिस्तान जम्मू-काश्मीरमधील लोकांमध्ये जातीय फूट निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत," असं सिंह यांनी म्हटलं.
पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला
जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी या घटनेबाबत मीडियाला माहिती देताना सांगितले की, "20 जानेवारीला दोन ठिकाणी बॉम्ब लावण्यात आले होते. 21 जानेवारीला 20 मिनिटांच्या अंतराने दोन स्फोट घडवून आणण्यात आले. या स्फोटात जास्तीत जास्त लोक मारले जावेत यासाठी हा कट रचण्यात आला होता. पहिल्या IED स्फोटानंतर पोलिसांनी SOP चे पालन केल्यामुळे जास्तीत जास्त नुकसान करण्याचा दहशतवाद्यांचा हेतू टळला. अन्यथा दुसऱ्या IED स्फोटात मोठे नुकसान होण्याची अपेक्षा होती. पहिल्या IED स्फोटापेक्षा दुसरा IED स्फोट खूप मोठा होता."