Jammu Kashmir News: श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांचा पोलीस पथकावर गोळीबार, प्रत्युत्तरात एक दहशतवादी ठार
Jammu Kashmir News: अलीकडच्या काळात जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली आहे. पाच दिवसातच दहशतवाद्यांनी सात जणांचा बळी घेतला.
Jammu Kashmir News: जम्मू -काश्मीरच्या श्रीनगरमधील नातीपोरा भागात शुक्रवारी दहशतवाद्यांनी पोलिसांच्या पथकावर गोळीबार केला. यानंतर, प्रत्युत्तरादाखल, पोलीस दलाने एका दहशतवाद्याला ठार केले. मात्र, दुसरा घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये अलीकडच्या काळात दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली आहे.
गुरुवारीच दहशतवाद्यांनी श्रीनगरच्या सफाकदल भागात रात्री 8:40 वाजता सुरक्षा दलांवर ग्रेनेड फेकला. पण त्याच्या स्फोटात कोणीही मरण पावले नाही. एवढेच नाही तर दहशतवाद्यांनी एका सरकारी शाळेतील दोन शिक्षकांची गोळ्या घालून हत्या केली, ज्यात एका महिलेचाही समावेश होता. तत्पूर्वी मंगळवारी दहशतवाद्यांनी दीड तासात तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन जणांची गोळ्या घालून हत्या केली.
जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी गुरुवारी सांगितले की, काश्मीरमधील नागरिकांची, विशेषत: अल्पसंख्यांकांना लक्ष्य करुन हत्या करण्याचा उद्देश हा भीतीचे वातावरण निर्माण करणे आणि जुन्या सांप्रदायिक सलोख्याला हानी पोहचवणे आहे. सिंह म्हणाले की जे मानवता, बंधुता आणि स्थानिक मूल्यांना लक्ष्य करत आहेत ते लवकरच उघड होतील.
काश्मीरमध्ये पाच दिवसांत सात नागरिकांचा बळी गेला आहे. काश्मीरमधील दहशतवादी कारवाया पाहता गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी उच्चस्तरीय बैठक घेतली. शाहा यांनी जम्मू -काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांना दिल्लीला बोलावले आहे.
गेल्या पाच दिवसांमध्ये सात जणांची हत्या
यातल्या सहा हत्या एकट्या श्रीनगर भागातल्या आहेत. तर जानेवारी 2021 पासून आजपर्यंत इथं 25 सामान्य नागरिकांची हत्या करण्यात आल्यात. त्यात श्रीनगरमध्ये 10 जण, पुलवामा आणि अनंतनागमध्ये प्रत्येकी 4 जण तर कुलगाममध्ये 3 आणि बारामुलामध्ये दोघांची हत्या करण्यात आली. दहशतवाद्याच्या कुरापती सुरु असतानाच सुरक्षा दलाचीही कारवाई सुरु होती. वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत आपल्या सैन्यानं 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. काही ठिकाणी तर फिल्मी स्टाईलनं दहशतवादी संपवले. मात्र, यानंतरही दहशतवादी कारवाया काही थांबल्याच नाहीत.