Jammu Kashmir : कुलगाममध्ये काश्मिरी पंडित महिलेची हत्या, दहशतवाद्यांनी शाळेमध्ये झाडल्या गोळ्या
Jammu Kashmir Terrorist Attack : कुलगाममधील गोपालपुरा येथे एका काश्मिरी पंडित महिलेवर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर सुरक्षा दलाकडून संपूर्ण परिसराला घेराव घालण्यात आला आहे.
Jammu Kashmir Terrorist Attack : जम्मू-काश्मीरमध्ये पंडितांना सातत्याने लक्ष्य केले जात आहे. आज कुलगामच्या गोपालपुरा येथे संशयित दहशतवाद्यांनी एका पंडित महिलेवर गोळ्या झाडल्या. या शिक्षिका महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिथे तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सुरक्षा दलाकडून संपूर्ण परिसराला घेराव घालण्यात आला आहे. तसेच काश्मीर पोलिसांकडून शोध मोहीम राबवली जात आहे.
काश्मीर पोलिसांनी केले ट्विट
कुलगामच्या गोपालपुरा भागात दहशतवाद्यांनी एका महिला शिक्षकावर गोळीबार केल्याचे काश्मीर पोलिसांनी ट्विट केले आहे. रजनीबल असे या शिक्षिकेचे नाव आहे. ती सांबा येथील रहिवासी असून तिच्या पतीचे नाव राजकुमार आहे. यावेळी ती कुलगाममधील चावलगाममध्ये राहत असून तिची ड्युटी गोपालपुरा येथे सुरू होती. या प्राणघातक गुन्ह्यात सहभागी असलेल्या सर्व दहशतवाद्यांचा लवकरच शोध घेऊन त्यांचा खात्मा केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
या घटनेवर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया
या घटनेवर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले की, दक्षिण काश्मीरमधील कुलगाममध्ये आणखी एका स्थलांतरित सरकारी महिला शिक्षिकेवर हल्ला झाला. ते या हल्ल्यातून वाचतील अशी मी प्रार्थना करतो.
अवंतीपोरा येथे 2 दहशतवादी ठार
जम्मू-काश्मीरच्या अवंतीपोरामध्ये सुरक्षा दलाला पुन्हा मोठे यश मिळाले आहे. अवंतीपोरा येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. काश्मीर झोन पोलिसांनी सांगितले की, चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण काश्मीरच्या अवंतीपोरामध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला, त्यानंतर जवानांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले.
सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक
या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले. त्रालचा रहिवासी शाहिद राथेर आणि शोपियांचा रहिवासी उमर युसूफ अशी या दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी अवंतीपोरा येथील राजपोरा भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. या दहशतवाद्याचा अनेक हत्यांमध्ये सहभाग होता. माहिती देताना काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक (IG) विजय कुमार म्हणाले की, शाहिदचा अरिपालच्या शकीला नावाच्या महिलेच्या आणि लुरगाम त्रालचा सरकारी कर्मचारी जाविद अहमद यांच्या हत्येमध्ये सहभाग होता.