Jammu and Kashmir | कोरोना लसीकरणात जम्मू-काश्मीरमध्ये विक्रम; राष्ट्रीय सरासरीच्या दुप्पट लसीकरण
जम्मू-काश्मीरने कोरोनाला पराभूत करण्यासाठी सर्वात प्रभावी शस्त्र समजल्या जाणाऱ्या कोरोना लसीला घेऊन विक्रम नोंदविला आहे. राज्यात 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 60 टक्के लोकांना लस देण्यात आली आहे, जे राष्ट्रीय सरासरीपेक्षा दुप्पट आहे.
जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत असताना, या साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारही युद्धपातळीवर काम करत आहे. जम्मू-काश्मीरच्या आरोग्य विभागाचे आर्थिक आयुक्त अटल ढुल्लू यांच्या म्हणण्यानुसार, राज्यात 16 जानेवारी 2021 पासून कोरोना लसीकरणाचे काम सुरू झाले. त्यांनी दावा केला की आतापर्यंत जम्मू-काश्मीर सरकारने 28 लाखांहून अधिक 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले आहे.
राज्य सरकारचा असा दावा आहे की 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मर्यादेतील 60 टक्के लोकांना लस देण्यात आली आहे. तर 45 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचा विचार राष्ट्रीय पातळीवर केला तर हे प्रमाण 32 आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये लसीकरणाचे काम पार पाडण्यासाठी आरोग्य विभागात एक टास्क फोर्स तयार करण्यात आले आहे. ज्यामध्ये पोलिस, आरोग्य विभाग आणि महसूल विभागाचे अधिकारी एकत्र काम करत आहेत. हे लसीकरण अभियान खेड्यापाड्यात नेले जात आहे.
जम्मूच्या मढ ब्लॉकच्या पटवारी चंद्र यांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला खेड्यातील लोक लस घ्यायला येत नव्हते. परंतु, सरकारने या लसीकरणासाठी जनजागृती केल्यामुळे लोक पुढे येत आहेत. ते म्हणाले की, त्यांच्या ब्लॉकमधील 90 टक्क्यांहून अधिक लोकांना ही लस मिळाली आहे. आता 18 ते 44 वयोगटातील लसीकरणाची प्रतीक्षा आहे.
कोरोनाना रोखण्यासाठी लसीकरण हा एकमेव मार्ग असल्याचे गावकरीही म्हणत आहे. सुरुवातीच्या काळात कोरोनाची भीती वाटत होती. त्यामुळे आम्ही घराबाहेरही पडत नसल्याचे इथले गावकरी सांगत आहेत.
कोरोनापासून वाचण्यासाठी लस घेणे हा एकमेव पर्याय असल्याचे सिद्ध झालंय. त्यामुळे गावातील लोक देखील या लसीकरणात भाग घेत आहेत. त्याचबरोबर, जम्मू-काश्मीर सरकारने असा दावा केला आहे की येत्या काही दिवसांत ही लसीकरण मोहीम अधिक वेगवान केली जाईल.