(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमक, 3 दहशतवाद्यांना कंठस्नान; अल्पवयीन मुलाचाही समावेश
जम्मू-कश्मीर पोलिसांनी सांगितले की, शोपियानच्या हदीपुरा येथे सुरू असलेल्या चकमकीत एकूण 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले असून, सर्च ऑपरेशन सुरू आहे.
श्रीनगर : जम्मू-कश्मीरमध्ये शोपियान भागात सुरक्षाबल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांमध्ये एक 14 वर्षाचा अल्पवयीन देखील सामील होता. त्याला शरण आणण्यासाठी प्रयत्न केले गेले पण ते यशस्वी झाले नाहीत. दुसरीकडे, अनंतनाग जिल्ह्यातही सुरक्षाबल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. अनंतनागच्या बिजबिहारामध्ये ही चकमक सुरू असून तेथे 2 ते 3 दहशतवादी असल्याची माहिती आहे.
सुरक्षाबलाला दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील हदीपुरा येथे दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंततर त्यांनी त्या भागाला घेराव घालत सर्च ऑपरेशन सुरु केलं, त्यावेळी दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. याला सुरक्षाबलाने चोख प्रत्युत्तर दिलं. या करावाईत सुरक्षाबलाला तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं. सध्या दहशतवाद्याची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरु असून त्यांच्या संघटनेचं नावाची शोध घेतला जाईल.
अनंतनागच्या बिजबिहार भागात चकमक सुरू
अनंतनाग जिल्ह्यातही सुरक्षाबल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. अनंतनाग जिल्ह्यातील बिजबिहार भागातील सेमथानमध्ये दहशतवादी असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली. या माहितीच्या आधारे सुरक्षाबलाने या भागाला घेराव घालत सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं. या दरम्यान सुरक्षाबल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली.
याआधी गुरुवारी जम्मू-काश्मीरच्या शोपियांमधील एका मशिदीत दहशतवाद्यांनी प्रवेश केला होता. यावेळी सुरक्षाबलाने 5 दहशतवाद्यांना ठार केलं होतं. दक्षिण काश्मीरच्या अशांत शहरात प्रथमच 20 वर्षांहून अधिक काळांनंतर पाच दहशतवाद्याना ठार करण्यात यश आलं. शोपियांमधील मशिदीत घेराव घालण्याची दहशतवाद्यांची पहिलीच वेळ होती. शोपियानमधील शेवटची मोठी चकमक 1990 च्या उत्तरार्धात झाली होती. त्यावेळी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते.