Coronavirus Vaccine : देशातील लसीकरणाला मिळणार वेग; भारतातील Biological E. करणार J & J च्या लसीची निर्मिती
भारतातील Biological E. या संस्थेकडून (Johnson & Johnson) जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीच्या कोरोना लसीची निर्मिती करण्यात येणार आहे.
Coronavirus Vaccine : भारतातील Biological E. या संस्थेकडून (Johnson & Johnson) जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीच्या कोरोना लसीची निर्मिती करण्यात येणार आहे. सोबतच या कंपनीकडून त्यांच्या वेगळ्या कोरोना लसीचीही निर्मिती केली जाणार आहे. Biological E. च्या कार्यकारी संचालकांनी रॉयटर्सशी संवाद साधताना यासंदर्भातील माहिती दिली. त्यांच्या या निर्णयामुळं भारतात जाणावणारा लसींचा तुटवडा आणि पुरवठा यावर तोडगा निघण्यास मदत होणार आहे.
'दोन्ही लसींच्या निर्मितीसाठीच्या पायाभूत सुविधा आणि प्लांट वेगळे असणार असून, प्रत्येक लस स्वतंत्र पातळीवर तयार केली जाणार आहे', अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. स्थानिक पातळीवर जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीच्या चाचणीसाठी परवानगी मिळाल्यानंतर आता लसीच्या निर्मितीसंदर्भात हे पाऊल उचललं गेलं आहे.
Biological E. ही दक्षिण भारतातील हैदराबाद येथील संस्था आहे. या संस्थेकडून ऑगस्ट महिन्यापासून दर वर्षी 75 ते 80 मिलीयन लसींची निर्मिती करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. ही लस ह्युस्टनमधील Baylor College of Medicine आणि Dynavax Technologies Corp यांच्या प्रयत्नांतून तयार करण्यात आल्याची माहिती आहे.
कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगची गरज नाही; अमेरिकेचा दावा
2022 हे वर्ष संपण्यापूर्वी 1 बिलीयन लसींची निर्मिती करण्यासाठी बायोलॉजिकल ई. या संस्थेला अमेरिकेकडूनही अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याचं कळत आहे.
...तर देशातील लसीकरणाला मिळेल वेग
सध्याच्या घडीला भारतात कोविशील्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसींचा डोस नागरिकांना देण्यात येत आहे. यातच काही दिवसांपूर्वीच रशियाच्या स्फुटनिक या लसीच्या डोसची पहिली खेपही भारतात पोहोचली आहे. त्यामुळं आता ही लसही भारतीयांना देण्यात येणार आहे. असं असलं तरीही भारतातील लोकसंख्या पाहता लसींचा तुटवडा जाणवत असल्यामुळं प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांना लसीकरण मोहिमेत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशाच परिस्थितीमध्ये जॉन्सन अँड जॉन्सनची लस आमि बायोलॉजिकल ई. ची लसही वापरात आल्यास देशातील लसीकरण प्रक्रियेला नक्कीच वेग मिळेल.