INS Vagir : भारतीय नौदलाची 'सायलेंट किलर शार्क', 'आयएनएस वागीर' ताफ्यात दाखल होणार, 'ही' आहे खासियत
Indian Navy To Get INS Vagir : भारतीय नौदलाच्या (Indian Navy) ताफ्यात सोमवारी 'आयएनएस वागीर' पानबुडी सामील होणार आहे. ही ताफ्यातील पाचवी स्कॉर्पीन क्लास पाणबुडी असेल.
INS Vagir Submarine Indian Navy : भारतीय नौदलाची (Indian Navy) ताकद आणखी वाढणार आहे. नौदलाच्या ताफ्यामध्ये सोमवारी 23 जानेवारीला 'आयएनएस वागीर' (INS Vagir) पाणबुडी (Submarine) सामील होणार आहे. मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (Mazagon Dock Shipbuilders) या स्वदेशी कंपनीने या पाणबुडीची निर्मिती केली आहे. ही नौदलाच्या ताफ्यातील कलावरी श्रेणीतील पाचवी पाणबुडी आहे. भारतीय नौदलाच्या ‘प्रोजेक्ट 75’ अंतर्गत आतापर्यंत कलावरी श्रेणीतील चार पानबुड्या याआधीच नौदलात सामील झाल्या आहेत. सोमवारी INS Vagir नौदलात सामील होणार असून या कार्यक्रमासाठी नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरी कुमार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
भारतीय नौदलाची 'सायलेंट किलर शार्क'
भारतीय नौदलाला 23 जानेवारीला INS वागीर अटॅक पाणबुडी मिळणार आहे. कलावरी श्रेणीच्या पहिल्या तुकडीतील सहा पाणबुड्यांपैकी ही एक पाणबुडी आहे. संरक्षण तज्ज्ञ याला 'सायलेंट किलर शार्क' असं म्हणतात. ही पाणबुडी शत्रूला चकवा देणे आणि हल्ला करण्यात सक्षम आहे. शत्रूला कल्पनाही ने येता ही पाणबुडी त्यावर हल्ला करेल.
'आयएनएस वागीर' पाणबुडीची वैशिष्ट्ये
भारतीय नौदलात सामील होणारी 'आयएनएस वागीर' पाणबुडी एक आधुनिक डिझेल-इलेक्ट्रिक अटॅक सबमरीन आहे. आयएनएस वागीर समुद्रात भूसुरुंग टाकण्यास सक्षम आहे. ही 350 मीटर खोलीवर तैनात केली जाऊ शकते. ही पाणबुडी स्टेल्थ तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. त्यामुळे शत्रू सहजासहजी याचा शोध घेऊ शकणार नाही. यामध्ये जहाजविरोधी क्षेपणास्त्रेही बसवण्यात आली आहेत. ही पूर्णपणे स्वदेशी पाणबुडी आहे. ही पाणबुडी शत्रूला शोधून अचूक लक्ष्य करु शकते. त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते शत्रूच्या रडारमध्ये येणार नाही.
'प्रोजेक्ट 75' अंतर्गत निर्मिती
'आयएनएस वागीर' (INS Vagir) पाणबुडीच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. यानंतर आता INS Vagir पाणबुडी भारतीय नौदलात सामील करण्यात येईल. नौदलाने एका निवेदनात सांगितले होते की, 'प्रोजेक्ट 75, यार्ड 11879 अंतर्गत भारतीय नौदलाच्या पाचव्या कलावरी श्रेणीतील पाणबुडीने 1 फेब्रुवारीपासून सागरी चाचण्या सुरु केल्या. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडच्या (MDL) कान्होजी आंग्रे वेट बेसिनमधून नोव्हेंबर 2020 मध्ये पाणबुडीचे बांधकाम सुरु करण्यात आले. चाचण्या पूर्ण झाल्यानंतर ही पाणबुडी नौदलात सामील केली जाईल.'
'आत्मनिर्भर भारत होण्याच्या दिशेने मोठे पाऊल'
नौदल आणि देशाच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी आयएनएस वागीर सज्ज असल्याचे कमांडिंग ऑफिसर कमांडर एस. दिवाकर यांनी सांगितलं आहे. हे आत्मनिर्भर भारत होण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे. कलावरी श्रेणीतील ही पाचवी पाणबुडी आहे. वागीर भारतीय नौदलाच्या देखरेखीखाली पूर्णपणे माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडकडून (MDL) बांधण्यात आली आहे, ही अभिमानाची बाब आहे. या पाणबुडीच्या चाचण्या नौदल आणि MDL या दोघांनी संयुक्तपणे पार पाडल्या आहेत, असेही दिवाकर यांनी सांगितले. या पाणबुडीची निर्मिती 'प्रोजेक्ट 75' अंतर्गत करण्यात आली आहे. या प्रकल्पा अंतर्गत नौदलात कलावरी श्रेणीतील सहा पाणबुड्या सामील होणार आहेत. 'आयएनएस वागीर' पाचवी पाणबुडी आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या