Anantnag Encounter : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना कंठस्नान, अनंतनागमध्ये भारतीय लष्कराची कारवाई
Jammu-Kashmir: काश्मीरमधील अनंतनाग येथील भागात भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत 2-3 दहशतवाद्यांचा लष्कराकडून खात्मा करण्यात आला आहे.
Jammu-Kashmir: जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir) अनंतनाग (Anantnag) भागात दहशतवादी आणि भारतीय लष्करामध्ये चकमक झाल्याची माहिती समोर येत आहे. काश्मीर पोलिसांनी ट्वीट करत या कारवाईबद्दल माहिती दिली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंतनागमधील अनंदवन संगम भागात दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक (Encounter) झाली. या चकमकीत दोन ते तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आले आहे. तसेच काश्मीर पोलीस आणि लष्कराचे जवान या भागात सातत्याने कारवाई करत असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे.
अनंतनाग भागात झालेल्या चकमकीची माहिती काश्मीर पोलिसांनी दिली आहे. तसचे लष्कराच्या जवानांबरोबर काश्मीर पोलीस देखील घटनास्थळी उपस्थित होते. माहितीनुसार, दहशतवाद्यांनी (Terrorist) एका गावातून आपला तळ हलवून जंगलात तयार केला होता. तसेच काही दहशतवादी फरार झाले असल्याची देखील शंका व्यक्त केली जात आहे. जंगल परिसरात पोलीस आणि लष्कराची शोध मोहीम सध्या सुरु आहे. दहशतवाद्यांच्या तळावरुन काही प्रमाणात मुद्देमाल देखील जप्त करण्यात असल्याची माहिती देण्यात आली आहे.
An encounter has started at Andwan Sagam area of Anantnag. Police and security forces are on the job: Kashmir Zone Police
— ANI (@ANI) May 14, 2023
गेल्या आठवड्यात देखील झाली होती चकमक
जम्मू आणि काश्मीरच्या राजौरीमध्ये शुक्रवारी (5 मे) रोजी भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत भारतीय लष्कराचे पाच जवान शहीद झाले होते. राजौरीच्या मुठभेड जिल्ह्याच्या जंगलात दहशतवादी आणि भारतीय लष्करामध्ये चकमक झाली. त्यानंतर संपूर्ण राजौरीमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, या चकमकीदरम्यान दहशतवाद्यांनी केलेल्या बॉम्ब हल्ल्यात लष्कराचे दोन जवान शहीद झाले. तर या हल्ल्यात एका लष्कराच्या अधिकाऱ्यासह चार जवान जखमी झाले.
याशिवाय बारामुला जिल्ह्यात सहा मे रोजी जम्मू-काश्मीर पोलीस तसेच भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. काश्मीर पोलिसांनी ट्विटरवर याबाबतची माहिती दिली होती. त्याचबरोबर दहशतवाद्यांकडून एके-47 देखील जप्त करण्यात आली. या दहशतवाद्याचे नाव आबिद वानी असे होते. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा दहशतवादी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनांशी संबंधित होता.
हेही वाचा
Jammu-Kashmir: काश्मीरच्या राजौरीमध्ये दहशतवादी हल्ला, पाच जवान शहीद