India Weather Update : दिल्लीत यमुना नदी धोक्याच्या पातळीवर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
दिल्लीत यमुना नदी धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहे. सखल भागात राहणाऱ्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
India Weather Update: सध्या देशाच्या विविध भागात पाऊस कोसळताना दिसत आहे. अनेक ठिकाणी पाऊस आणि पुरामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. आजही अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि आसाम, अरुणाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान दिल्लीतही चांगला पाऊस कोसळत आहे. दिल्लीत यमुना नदी धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहे. सखल भागात राहणाऱ्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ, लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरु
यमुना नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. शनिवारी सायंकाळी 7 वाजेपर्यंत पाण्याची पातळी 205.92 मीटर होती. त्यानंतर संवेदनशील भागातून लोकांना बाहेर काढले जात आहे. पूर्व दिल्लीचे एसडीएम आमोद बर्थवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, नदीजवळील सखल भागात राहणाऱ्या 13 हजार लोकांपैकी 5 हजार लोकांना कॉमनवेल्थ गेम्स व्हिलेज, हाथी घाट आणि लिंक रोड येथे बांधलेल्या तंबूंमध्ये हलवण्यात आले आहे. करावल नगरचे एसडीएम संजय सोंधी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या जिल्ह्यातील सखल भागातील सुमारे 200 लोकांना सुरक्षीत ठिकाणी हलवण्यात आले आहे. पाणी, अन्न व इतर जीवनावश्यक गोष्टींची व्यवस्था करण्यात येत आहे. हरियाणाच्या यमुनानगरमधील हथनीकुंड बॅरेजमधून पाण्याचा विसर्ग एक लाख क्युसेकच्या पुढे गेला आहे. त्यानंतर दिल्लीत पुराचा इशारा देण्यात आला आहे.
धार धरणातून पाणी काढण्याचे काम सुरु आहे
मध्य प्रदेशातील धार धरणातून रात्री उशिरा पाणी सोडण्यात आले. मात्र, धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. आसपासच्या भागात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच करम धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळं यमुना नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशचा उर्वरित भाग, झारखंड, बिहारचा काही भाग, गुजरात, कोकण आणि गोवा, किनारी कर्नाटक, मराठवाडा, तेलंगणाच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे.
दिल्लीत हवामान कसे असेल?
देशाची राजधानी दिल्लीत हवामानात चढ-उतार सुरूच आहे. दिल्लीत आज पावसाची शक्यता आहे. तीन दिवस हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दिल्ली-एनसीआरच्या अनेक भागात आज हलका पाऊस पडू शकतो. पुढील तीन दिवस असेच वातावरण राहण्याची शक्यता आहे. शनिवारीही दिल्ली-एनसीआर भागात ढगाळ वातावरण होते.
मध्यप्रदेश, छत्तीसगडमध्ये पावसामुळं आपत्ती
मध्य प्रदेशातील अनेक भागात पाऊस आणि पुरामुळं लोक संकटात सापडले आहेत. ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, आसाम, अरुणाचल प्रदेश आणि आग्नेय उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये एक किंवा दोन जोरदार सरीसह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
देशातील अनेक भागात पावसाची शक्यता आहे
याशिवाय दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशचा उर्वरित भाग, झारखंड, बिहारचा काही भाग, गुजरात, कोकण आणि गोवा, किनारी कर्नाटक, मराठवाडा, तेलंगणाचा काही भाग आणि अंदमान निकोबार बेटांवर हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. आहे. तेलंगणाच्या काही भागांव्यतिरिक्त, अंतर्गत कर्नाटक, उर्वरित ईशान्य भारत आणि लडाखमध्ये हलका पाऊस अपेक्षित आहे. बिहारच्या काही भागात शनिवारी उष्णतेनंतर हलका पाऊस झाला.
राजस्थानच्या अनेक भागात आज पाऊस झाला
राजस्थानच्या अनेक भागात आज पावसाची शक्यता आहे. कोटा, उदयपूर आणि भरतपूर विभागात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासोबतच 15 ऑगस्ट रोजी कोटा, उदयपूर आणि अजमेर विभागातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने पश्चिम राजस्थानमध्ये 15 ऑगस्टला, तर पूर्व राजस्थानमध्ये 14 ऑगस्टला यलो अलर्ट जारी केला आहे. त्याचवेळी 15 ऑगस्टसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Maharashtra Rain : कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात आज पावसाचा इशारा
- Maharashtra Rain : पुढील तीन दिवस कोकणसह, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात यलो अलर्ट, धरणांच्या पाणी साठ्यात वाढ