India Rain Update: पुरामुळं उत्तर भारतात गंभीर स्थिती, अनेक भागात जनजीवन विस्कळीत; उत्तराखंडला 413 कोटींची मदत
Rain Update : उत्तर भारतात (North India) मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे.
Rain Update : सध्या उत्तर भारतात (North India) मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. नद्यांना पूर आल्यामुळं या ठिकाणची परिस्थिती गंभीर बनली आहे. हिमाचल प्रदेशसह उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, दिल्ली उत्तर प्रदेश या राज्यांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान, या पावसामुळं हिमाचल प्रदेशात आत्तापर्यंत 88 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 16 जण बेपत्ता असून, 100 जण जखमी झाले आहेत.
उत्तराखंडला केंद्र सरकारकडून 413 कोटी रुपयांची मदत
उत्तर भारतात पुरामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. हिमाचल प्रदेशच्या चंद्रतालमध्ये अनेक प्रवासी अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. उत्तराखंडमध्येही अनेक ठिकाणी पाऊस सुरुच आहे. उत्तराखंडमध्येही नद्यांना पूर आल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. आपत्ती निवारण्यासाठी उत्तराखंड राज्याला केंद्र सरकारकडून 413 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमध्ये केदारनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी भाविकांना हवामान स्वच्छ झाल्यानंतरच येण्याचा सल्ला दिला आहे.
पंजाबमधील 13 जिल्हे पुराच्या तडाख्यात
उत्तराखंड सरकारने एक हेल्पलाइन क्रमांकही जारी केला आहे. पंजाबमधील 13 जिल्हे पुराच्या तडाख्यात आले असून 479 गावे बाधित झाली आहेत. पाकिस्तानमधील धरण फुटल्याने पाणी भारताच्या सीमावर्ती भागात शिरले आहे. दरम्यान, आज संपूर्ण पंजाबमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
45 वर्षांनंतर यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ
देशाची राजधानी दिल्लीत यमुनेच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने पुराचा धोका निर्माण झाला आहे. तब्बल 45 वर्षांनंतर यमुना नदीच्या पाण्याची पातळी 208 मीटरच्या पुढे गेली आहे. यापूर्वी 9 जून 1978 रोजी यमुना नदीची जलपातळी 207.49 इतकी नोंदवण्यात आली होती.
18 राज्यांतील 188 जिल्ह्यांना पुराचा तडाखा
देशाची राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरियाणामध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुरामुळं अनेक भाग पाण्याखाली गेले, असून लोकांना घर सोडून इतर ठिकाणी हलवण्यात येत आहे. देशातील 18 राज्यांतील 188 जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला असून मोठं नुकसान झालं आहे. तर यामध्ये आत्तापर्यंत 574 जणांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळं अनेक भागात भूस्खलन झालं आहे. त्यामुळं वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचं चित्र दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Maharashtra Rain : राज्याच्या काही भागात पावसाची हजेरी, आज कोकणासह मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात यलो अलर्ट