India Post Scam : पोस्ट खात्याच्या नावाने पत्ता अपडेट करण्यासाठी SMS येतोय? मग सावधान, अन्यथा महागात पडेल
India Post SMS Scam Alert : भारतीय पोस्ट खात्याच्या नावाने पत्ता अपडेट करण्यासाठी एक फेक मेसेज येत असून त्यासोबत एक लिंकही दिली जाते.
मुंबई : तुमचे पार्सल गोदामात येऊन पडलं आहे, या आधी तुमच्याशी दोन वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न झाला आहे. आता जर पार्सल परत जायचं नसेल तर पुढच्या 48 तासांमध्ये तुमचा पत्ता अपेडेट करा... पोस्ट खात्याच्या नावे अशा आशयाचा जर मेसेज जर तुम्हाला आला असेल तर सावधान. असं कोणतंही पार्सल तुमच्या नावे आलं नसून हा मोठा घोटाळा आहे. पीआयबी फॅक्ट चेकने या मेसेजची तपासणी करून हा मेसेज फेक असल्याची पुष्टी केली असून अशा मेसेजपासून लोकांनी सावध राहण्याची गरज आहे.
जामतारा स्टाईलने लोकांना कॉल करून फसवण्याचे प्रकार याआधी उघडकीस आले आहेत. लोक आता यापासून सावध झाल्यानंतर चोरट्यांनी आता त्यांच्या चोरीच्या पद्धतीत बदल केल्याचं दिसून आलंय.
अलीकडेच एक नवीन प्रकरण समोर आले असून त्यामध्ये इंडिया पोस्टशी संबंधित एक मेसेज प्रसारित केला जात आहे. या मेसेजमधून लोकांना त्यांचा पत्ता अपडेट करण्यास सांगितले जात आहे. हा मेसेज एक फिशिंग स्कॅम असल्याचं उघड झालं असून लोकांनी त्यापासून सावध राहिलं पाहिजे असं आवाहन करण्यात येत आहे. पत्ता अपडेट करण्याचा दावा करणारे इंडिया पोस्टचे हे संदेश बनावट असल्याचं फॅक्ट चेकमधून स्पष्ट झालं आहे.
Have you also received an SMS from @IndiaPostOffice stating that your package has arrived at the warehouse, further asking you to update your address details within 48 hours to avoid the package being returned ⁉️#PIBFactCheck
— PIB Fact Check (@PIBFactCheck) June 17, 2024
✔️Beware! This message is #fake pic.twitter.com/8tRfGDqn1r
प्रकरण नेमकं काय आहे?
इंडिया पोस्टच्या नावाने मोबाईलमध्ये एक मेसेज येतो. त्यामध्ये म्हटलं जातंय की, तुमचे पॅकेज वेअरहाऊसमध्ये आहे आणि अपूर्ण पत्त्याच्या अपुऱ्या माहितीमुळे ते पोहोचवण्यामध्ये अडचणी येत आहेत. हा मेसेज मिळाल्यानंतर तुम्हाला 48 तासांच्या आत तुमचा पत्ता अद्ययावत करावा लागेल. अन्यथा हे पॅकेज परत केले जाईल. या संदेशासोबत एक संशयास्पद लिंक (indisposegvs.top/IN) देखील देण्यात येते..
PIB Fact Check ने हा संदेश FAKE असल्याचं सांगितलं आहे.भारतीय पोस्ट खातं पार्सलच्या डिलिव्हरीसाठी पत्ता अपडेट करण्याची विनंती करणारा एसएमएस पाठवत नाही असं त्यामध्ये सांगण्यात आलं आहे.
अशा फसवणुकीला बळी न पडण्यासाठी काय करावं?
अनोळखी नंबरवरून आलेल्या मेसेजवर विश्वास ठेवू नका. विशेषत: जे पत्ता किंवा नंबर तातडीनं अपडेट करण्याची मागणी करत आहेत असा मेसेजकडे दुर्लक्ष करा.
एखादा मेसेज एखाद्या कंपनीचा असल्याचा दावा करत असल्यास, त्यांच्याशी फोन नंबर किंवा वेबसाइटद्वारे संपर्क साधा.
संशयास्पद मजकूर असलेल्या लिंकवर क्लिक करणे टाळा. अगदी आवश्यक असल्यास वेबसाइट पत्ता स्वतः टाइप करा.
याशिवाय वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती कधीही टेक्स्ट मेसेजद्वारे शेअर करू नका. तसेच कोणताही संशयास्पद मजकूर योग्य अधिकाऱ्यांना कळवा.