Ola and Uber : ओला आणि उबेरच्या विलीनीकरणाच्या चर्चेवर भाविश अग्रवाल यांचे स्पष्टीकरण, म्हणाले...
Ola and Uber : ओला आणि उबेरला भारतीय बाजारपेठेत सध्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकीकडे ओलाला आपला किराणा व्यवसाय बंद करावा लागला. तर उबेरलाही आपले 'उबेर ईट्स' झोमॅटोला विकावे लागले.
Ola and Uber : कॅब कंपनी ओला (Ola ) आणि उबेरच्या ( Uber) विलीनीकरणाच्या चर्चेवर ओलाचे सह-संस्थापक भाविश अग्रवाल यांनी स्पष्टीकरण दिले आहे. कोणतेही विलीनीकरण होणार नसल्याचे अग्रवाल यांनी म्हटले आहे. ओला आणि उबेरचे विलीनीकरण होणार असल्याच्या गेल्या काही दिवसांपासून चर्चा होत होत्या. परंतु, या सर्व चर्चा निरर्थक असल्याचे भाविश अग्रवाल यांनी म्हटले आहे. भाविश अग्रवाल यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.
"विलीनीकरणाच्या चर्चा निरर्थक असून आमची नफा कमावणारी कंपनी आहे. शिवाय सध्या आमच्या कंपनीची वाढ देखील चांगली होत आहे. इतर कोणत्याही कंपनीला मार्केट सोडायचे असेल तर त्याचे स्वागत आहे. आम्ही कधीही कोणत्याही कंपनीत विलीन होणार नाही, असे ट्विट भाविश अग्रवाल यांनी म्हटले आहे.
Absolute rubbish. We’re very profitable and growing well. If some other companies want to exit their business from India they are welcome to! We will never merge. https://t.co/X3wC9HDrnr
— Bhavish Aggarwal (@bhash) July 29, 2022
दरम्यान, उबेरने देखील विलीनीकरनाचे वृत्त फेटाळून लावले आहे. ओलाच्या अधिकाऱ्यांसोबत कंपनीची कोणतीही बैठक झालेली नाही आणि विलीनीकरणाची अशी कोणतीही योजना देखील नाही. सध्या जी चर्चा होत आहे, ते सत्य नाही, असे उबेरकडून सांगण्यात आले आहे.
ओला आणि उबेरला भारतीय बाजारपेठेत सध्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकीकडे ओलाला आपला किराणा व्यवसाय बंद करावा लागला. तर उबेरलाही आपले 'उबेर ईट्स' झोमॅटोला विकावे लागले. या सगळ्यावर वाढत्या स्पर्धेदरम्यान, दोन्ही कॅब कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना वेळोवेळी मोठ्या सवलती दिल्या. त्यामुळे कंपन्यांची परिस्थिती बिघडली आहे. या आव्हानांमुळेच ओला आणि उबेर विलीन होऊ शकतील अशा बातम्यांना पसरल्या होत्या.
उबेर सध्या जास्त अडचणीत आहे. आशियातील उबेरची बाजारपेठ केवळ जपान आणि भारतापुरती मर्यादित आहे. काही देशांमध्ये त्यांना सेवा थांबवावी लागली आहे. कोरोनाचा देखील त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. दरम्यान, आता दोन्ही कंपन्यांनी स्पष्टीकरण दिल्यामुळे तुर्तास तरी या कंपन्यांचे विलीनीकरण होण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे.