India Lock Down | शूट अॅट साईटचा आदेश द्यायला भाग पाडू नका : तेलंगणा सरकार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (24 मार्च) संपूर्ण देशात 21 दिवस म्हणजेच 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली. परंतु लॉकडाऊन मोडून लोक सातत्याने घराबाहेर पडत असल्याने शूट अॅट साईटचा आदेश द्यायला भाग पाडू नका, असं तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव म्हणाले.
![India Lock Down | शूट अॅट साईटचा आदेश द्यायला भाग पाडू नका : तेलंगणा सरकार India lockdown - don't force us to shoot at sight, says Telangana CM K Chandrasekhar Rao India Lock Down | शूट अॅट साईटचा आदेश द्यायला भाग पाडू नका : तेलंगणा सरकार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/03/25172824/K-Chandrashekhar-Rao.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
हैदराबाद (तेलंगणा) : "आम्हाला संचारबंदी किंवा शूट अॅट साईटचा आदेश द्यायला भाग पाडू नका," असा सज्जड दम तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी भरला आहे. हैदराबादमधील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. नागरिकांनी लॉकडाऊन आदेशाचं उल्लंघन केल्यास शूट अॅट साईटचा आदेश द्यावा लागेल. त्यामुळे अशी परस्थिती उद्भवू देऊ नका," असं चंद्रशेखर राव म्हणाले. सोमवार आणि मंगळवारी लोक ज्याप्रकारे लॉकडाऊन तोडून घराबाहेर पडले त्यावर केसीआर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर तेलंगणा सरकारने याआधीच संपूर्ण राज्यात 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (24 मार्च) संपूर्ण देशात 21 दिवस म्हणजेच 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला.
लॉकडाऊनविषयी बोलताना मुख्यमंत्री चंद्रशेखर राव म्हणाले की, "अमेरिकेत लॉकडाऊनची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी सैन्याला पाचारण करावं लागलं आहे. लोकांनी लॉकडाऊन पाळला नाही तर आम्हाला 24 तासांचा कर्फ्यू लावावा लागेल आणि शूट अॅट साईटचा आदेश द्यावा लागेल. त्यामुळे नागरिकांना विनंती आहे की अशी परिस्थिती उद्भवू देऊ नका."
"हैदराबादमधील सर्व नगरसेवकांनी रस्त्यावर उतरुन सर्व चेक पोस्टवर पोलिसांना मदत करावी," अशी सूचनाही चंद्रशेखर राव यांनी दिली. "लॉकडाऊनबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सर्व मंत्री, आमदार आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असंही ते म्हणाले. मात्र सैन्याला पाचारण करणं, कर्फ्यू लावणं किंवा शूट अॅट साईटचा आदेश द्यावे लागेल, अशी परिस्थिती उद्धवू देऊ नका," असं चंद्रशेखर राव यांनी सांगितलं.
चंद्रशेखर राव यांच्या माहितीनुसार, राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 36 झाली आहे आणि 19,313 जण देखरेखीखाली आहेत. त्यांचे पासपोर्ट परत करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. 114 जण संशियत आहे. त्यांचे अहवाल बुधवारी (25 मार्च) मिळतील.
कोरोना व्हायरसमुळे देशभरात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोनाचे तीन बळी गेले तर दिल्लीत दोघे मृत्युमुखी पडले आहेत. देशभरातील कोरोनाबाधितांचा आकडा 562 वर पोहोचला आहे.
India Lock Down | आम्हाला शूट अॅट साईटचा आदेश द्यायला भाग पाडू नका : तेलंगणा सरकार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)