नवी दिल्ली : देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन जनतेला संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमाला टोकियो ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकणाऱ्या नीरज चोप्रासहित इतर 32 खेळाडूंना विशेष आमंत्रित करण्यात आलं आहे. आजच्या लाल किल्ल्यावरील या कार्यक्रमावर भारतीय वायुदलाच्या वतीनं पुष्पवृष्टी करण्यात आली आहे.
देश आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणार आहे. या कार्यक्रमाचा सोहळा आज विशष पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजघाटवर जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीला श्रद्धांजली वाहतील. त्यानंतर सकाळी 7.18 मिनीटांनी ते लाल किल्ल्याच्या लाहोरी गेट वर पोहोचतील. लाल किल्ल्यावरील या कार्यक्रमासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनलर बिपिन रावत, संरक्षण सचिव अजय कुमार आणि लष्कराच्या तीनही दलाचे प्रमुख उपस्थित असतील.
त्यानंतर पंतप्रधानांना लष्कराच्या तीनही दलांकडून मानवंदना देण्यात येणार आहे. या दरम्यान, दिल्ली पोलिसांची एक तुकडीही या कार्यक्रमात उपस्थित असणार आहे. या मानवंदनेनंतर पंतप्रधान लाल किल्ल्यावर पोहोचतील आणि तिरंगा फडकावतील. यावेळी राष्ट्रगीताची धुन वाजवण्याची जबाबदारी इंटर-सर्व्हिस ब्रॅन्डकडे असेल.
ध्वजारोहणाच्या कार्यक्रमावेळी लष्कराकडून 21 तोफेंची सलामी देण्यात येणार आहे. त्यानंतर लष्कराच्या वेगवेगळ्या तुकड्या आणि दिल्ली पोलिसांच्या तुकडीच्या वतीनं मानवंदना देण्यात येणार आहे. यावेळी भारतीय वायुदलाच्या वतीनं हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.
सुरक्षेचे कडक उपाय
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशामध्ये सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. दिल्लीच्या लाल किल्ल्यावरुन भारतीय पंतप्रधानांचे करण्यात येणारे संबोधन लक्षात घेता सुरक्षेचा उपाय म्हणून लाल किल्ल्याच्या आजूबाजूला शिपिंग कंटेनरच्या इमारती उभारण्यात आल्या आहेत. या कंटेनरच्या इमारतींच्या माध्यमातून 'राष्ट्र प्रथम-सदैव प्रथम' हा संदेश देण्यात येणार असून देशाच्या सांस्कृतीक, वैज्ञानिक आणि राष्ट्राशी संबंधित इतर पेंटिंगही त्यावर दिसून येणार आहेत.
सुरक्षेच्या कारणास्तवर उभारण्यात येणाऱ्या या कंटेनरच्या इमारतींवर महात्मा गांधी, सरदार पटेल, भगत सिंह आणि नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमा दिसणार आहेत. या कंटेनरच्या दुसऱ्या बाजूला तिरंग्याची प्रतिमा रंगवण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या :
- President Ram Nath Kovind Speech : राष्ट्रपतींचं स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधन; कोरोना लस, कृषी, जम्मू काश्मीरसहित अनेक मुद्द्यांवर भाष्य
- Independence Day : भारताच्या स्वातंत्र्यासाठी 15 ऑगस्ट हाच दिवस का निवडला? काय आहे त्यामागचे ऐतिहासिक कारण?
- Independence Day 2021: 'या' स्वातंत्र्यदिनीही पंतप्रधान मोदी लांबलचक भाषण देणार का? काय आहे आतापर्यंतचा इतिहास?