Independence Day 2021 : देश आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणार आहे. या कार्यक्रमाचा सोहळा आज विशेष पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन जनतेला संबोधित करणार आहेत. तत्पूर्वी पंतप्रधानांनी ट्वीट करत देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटलं आहे की,  आपणा सर्वांना 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे हे वर्ष देशवासियांमध्ये नवी ऊर्जा आणि नवीन चेतना घेऊन येईल. जय हिंद!.  






  कोरोनामुक्तीच्या लढ्याला बळ देऊया, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे  आवाहन


कोट्यवधी देशभक्तांच्या त्याग, बलिदान, समर्पणातून मिळालेलं स्वातंत्र्य, देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता अबाधित राखण्याचा, भारतीय राज्यघटना, लोकशाही व्यवस्था व मुल्यांची जपणूक करण्याचा, देशाचा प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी विचार पुढे घेऊन जाण्याचा, सर्वधर्मसमभावाचा आदर करीत सर्व समाजघटकांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर अथक, निरंतच चालत राहण्याचा आपण सर्वजण पुन्हा एकदा दृढनिश्चय करुया,” असे आवाहन करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशवासियांना स्वातंत्र्याच्या 74व्या वर्धापनदिनानिमित्तानं शुभेच्छा दिल्या आहेत. समस्त देशवासिय आज कोरोनापासून मुक्तीचा लढा मोठ्या निर्धारानं लढत आहेत. प्रतिबंधक नियमांचं काटेकोर पालन करुन आपणही कोरोनामुक्तीच्या लढ्याला बळ देऊया... महाराष्ट्र व देश कोरोनामुक्त करण्याचा निर्धार करुया... असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देताना केलं आहे.  महाराष्ट्राचा इतिहास संघर्षाचा आहे. देशावरील प्रत्येक संकटावेळी महाराष्ट्र मदतीसाठी, संरक्षणासाठी धावून गेल्याचा इतिहास आहे. इतिहासाची ही गौरवशाली परंपरा महाराष्ट्र कायम राखेल, हा विश्वास देतो. महाराष्ट्र आणि देश आज कोरोना संकटाशी लढत आहे. 75 वर्षांपूर्वी आपण देशाच्या स्वातंत्र्याचा लढा निर्धाराने लढलो. सद्यस्थितीत कोरोनामुक्तीचा, कोरोनापासून स्वातंत्र्याचा लढा त्याच निर्धाराने लढायचा आहे. मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, गर्दी टाळणे, हात वारंवार स्वच्छ धुणे आदी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करुन आपण कोरोनामुक्तीचा लढा निश्चितपणे जिंकू शकू, असा विश्वास करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सर्व देशवासियांना कोरोनामुक्त जीवनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.