Independence Day : 15 ऑगस्ट 1947 हा दिवस भारतासाठी एकदम खासच. आज भारत आपला 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. याच दिवशी ब्रिटिशांच्या जवळपास 150 वर्षांच्या गुलामीच्या जोखडातून भारत मुक्त झाला आणि नागरिकांनी स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेतला. भारताला स्वातंत्र्य करण्यासाठी अनेक ज्ञात आणि अज्ञात लोकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी मध्यरात्री घड्याळात 12 च्या ठोका वाजला आणि भारत स्वातंत्र्य झाला. पण भारतीय स्वातंत्र्यासाठी 15 ऑगस्ट हाच दिवस का निवडला? हा दिवस निवडण्यामागे काही ऐतिहासिक कारण होतं का? आपण याच दिवशी स्वातंत्र्याचा जल्लोश साजरा का करतो त्यामागचे कारण जाणून घेऊया.


देश खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य होण्यापूर्वी आपण 26 जानेवारी हाच दिवस प्रतिकात्मक स्वातंत्र्यदिवस म्हणून साजरा करत होतो. त्यामागेही एक महत्वाचं कारण होतं. म्हणजे 26 जानेवारी 1929 साली राष्ट्रीय काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनामध्ये 'पूर्ण स्वराज्या'ची मागणी करण्यात आली होती. याच अधिवेशनात गांधीजींनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरु करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे नंतरच्या काळात म्हणजे 1947 पर्यंत, 26 जानेवारी हाच दिवस स्वातंत्र्यदिवस म्हणून साजरा करण्यात यायचा. 


माऊंटबॅटन यांच्यासाठी 'खास' दिवस
भारतीय स्वातंत्र्यलढा अंतिम टप्प्यात असताना ब्रिटिशांनी लॉर्ड माऊंटबॅटन यांची भारताच्या व्हाईसरॉय पदी नियुक्ती केली. त्यांच्यावर भारताकडे सत्ता हस्तांतरण करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. माऊंटबॅटन यांनी 3 जून 1947 साली भारतीय स्वातंत्र्यासाठी एक योजना मांडली. त्याला '3 June Plan' किंवा 'माऊंटबॅटन प्लॅन' या नावानेही ओळखलं जातं. 


माऊंटबॅटन यांनी भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी 15 ऑगस्ट 1947 ही तारीख निश्चित केली. पण देशभरातून यावर निराशा व्यक्त करण्यात येत होती. कारण भारतीय ज्योतिषशास्त्राप्रमाणे, 15 ऑगस्ट 1947 हा दिवस अशुभ होता. त्यामुळे या दिवशी स्वातंत्र्य नको असं सांगत त्याबद्दल इतरही तिथी सूचवण्यात आल्या. पण लॉर्ड माऊंटबॅटन हे 15 ऑगस्ट याच दिवसावर आग्रही होते. 


लॉर्ड माऊंटबॅटन हे 15 ऑगस्ट या दिवसाला आपल्या कारकिर्दीसाठी शुभ मानायचे. महत्वाचं म्हणजे ब्रिटिशांसाठीही हा दिवस महत्वाचा होता. कारण दुसऱ्या महायुद्धामध्ये 15 ऑगस्ट 1945 या दिवशी जपानने ब्रिटिश आणि मित्र राष्ट्रांसमोर शरणागती पत्करली होती. त्यामुळे लॉर्ड माऊंटबॅटन याच दिवसावर आडून होते आणि भारतीय नेत्यांचा नाईलाज झाला. 


यावर 'अभिजीत मुहूर्त'चा तोडगा 
शास्त्रांच्या अनुसार 'अभिजीत मुहूर्त' हा असा अतिशय शुभ आणि फलदायी मुहूर्त मानला जातो. या 24 मिनीटांच्या मुहूर्तामध्ये शुभ कार्ये सिद्धीस नेली जातात. 14 ऑगस्टच्या रात्री 11 वाजून 51 मिनीटांपासून सुरु होणारा हा मुहूर्त 12 वाजून 15 मिनीटांपर्यंत, एकूण 24 मिनीटांचा होता. त्यामध्ये आणखी ज्योतिषशास्त्रांचा संदर्भ देऊन नेहरुंचे स्वांतत्र्याचे भाषण हे मध्यरात्री 12 वाजून 39 मिनीटांपर्यंत द्यायचं असं ठरवण्यात आलं. 


ठरलेल्या तारखेप्रमाणे आणि वेळेप्रमाणे सगळं जग झोपेत असताना 15 ऑगस्टच्या पहिल्या ठोक्याला भारत स्वातंत्र्य झाला, तशी घोषणा तत्कालीन पंतप्रधान नेहरुंनी केली. 


अशा पद्धतीने भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी 15 ऑगस्ट 1947 या खास दिवसाची निवड करण्यात आली. आता हा दिवस अब्जावधी भारतीयांसाठी खास झाला आहे. 


महत्वाच्या बातम्या :