President Ram Nath Kovind Speech: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधित केले. कोरोना महामारीचा संदर्भ देत ते म्हणाले की कोरोना साथीची तीव्रता कमी झाली आहे पण कोरोना विषाणूचा प्रभाव अजून संपलेला नाही. सर्व जोखीम घेत, कोरोनाची दुसरी लाट आमच्या डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, प्रशासक आणि इतर कोरोना योद्ध्यांच्या प्रयत्नांनी नियंत्रित केली जात आहे.
आपल्या वैज्ञानिकांनी खूप कमी वेळात लस तयार करण्याचं कठीण काम केलं. त्यामुळेच या वर्षाच्या सुरुवातीला आपण सर्वजण एका विश्वासानं आश्वस्त होतो कारण आपण इतिहासातली सगळ्यात मोठी लसीकरण मोहीम सुरू केली होती. तरीही विषाणूची नवी रूपं आणि इतर अकल्पित कारणांमुळे आपल्याला दुसऱ्या लाटेचा भयावह प्रकोप सहन करावा लागला, असं राष्ट्रपतींनी म्हटलं.
लवकर लस घेण्याचं आवाहन
सर्व देशवासियांना मी विनंती करतो की प्रोटोकॉलनुसार लस लवकरात लवकर घ्यावी आणि इतरांनाही प्रेरित करावे. यावेळी लस हे आपल्या सर्वांसाठी विज्ञानाने प्रदान केलेले सर्वोत्तम संरक्षण आहे. मी सर्व देशवासियांना विनंती करतो की प्रोटोकॉलनुसार लस लवकरात लवकर घ्यावी, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटल. वैद्यकीय सुविधांच्या विस्तारासाठी एका वर्षाच्या कालावधीत 23,220 कोटी रुपये खर्च केले जात आहेत, हेआनंददायक आहे, असंही त्यांनी म्हटलं.
आपल्या प्रजासत्ताकाच्या या 75 वर्षांच्या वाटचालीवर जेव्हा आपण नजर टाकतो तेव्हा या गोष्टीचा अभिमान वाटतो की आपण प्रगतीच्या मार्गावर खूप मोठा पल्ला गाठला आहे. गांधीजींनी आपल्याला हे शिकवलंय की चुकीच्या दिशेनं वेगात पावलं टाकण्यापेक्षा, योग्य दिशेनं हळूहळू का होईना पण जपून पावलं पुढे टाकायला हवीत. अनेक परंपरांनी समृद्ध अशा भारताच्या सर्वात मोठ्या आणि चैतन्यपूर्ण लोकशाहीच्या अद्वितीय यशाकडे जागतिक समुदाय आदरानं पाहतो, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं.
सर्व प्रकारच्या अडचणी असूनही ग्रामीण भागात, विशेष करून कृषी क्षेत्रात वृद्धी कायम आहे. नुकतच, कानपुर ग्रामीण जिल्ह्यात असलेल्या माझ्या वडिलांच्या परौंख या गावी दिलेल्या भेटीदरम्यान, ग्रामीण भागातल्या लोकांचं जीवन सुकर बनवण्यासाठी उत्तम पायाभूत सुविधा विकसित केल्या जात आहेत हे पाहून, मला खूप बरं वाटलं. शहरी आणि ग्रामीण भागामध्ये असलेलं मानसिक अंतर आता पूर्वीपेक्षा खूप कमी झालं आहे. मुळात भारत हा गावांमध्येच वसलेला आहे. त्यामुळे त्यांना विकासाच्या बाबतीत मागे ठेवून चालणार नाही, असंही त्यांनी म्हटलं.
जम्मू -काश्मीरच्या तरुणांना तुम्ही काय म्हणालात?
जम्मू -काश्मीरमधील रहिवाशांना, विशेषत: तरुणांना या संधीचा लाभ घ्या आणि लोकशाही संस्थांच्या माध्यमातून त्यांच्या आकांक्षा साकार करण्यासाठी सक्रिय व्हावे, असं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. आता जम्मू -काश्मीरमध्ये एक नवीन जागरुकता दिसत आहे. सरकारने लोकशाही आणि कायद्याच्या राज्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व पक्षांशी सल्लामसलत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, असंही त्यांनी म्हटलं.
नुकत्याच झालेल्या टोक्यो ऑलिंपिक मध्ये आपल्या खेळाडूंनी आपल्या शानदार कामगिरीनं देशाचा मान वाढवला आहे. भारतानं ऑलिंपिक मधल्या आपल्या सहभागाच्या 121 वर्षांमध्ये सर्वाधिक पदकं जिंकण्याचा इतिहास या खेपेस रचला आहे. आपल्या मुलींनी अनेक अडचणींवर मात करत खेळाच्या मैदानात जागतिक दर्जाचं प्रभुत्व मिळवलं आहे. खेळा सोबतच जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात, महिलांचा सहभाग आणि यशात, महत्त्वपूर्ण बदल होत आहेत. उच्च शिक्षणसंस्थां पासून सशस्त्र दलां पर्यंत, प्रयोगशाळांपासून खेळाच्या मैदानांपर्यंत, आपल्या मुली स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करत आहेत. मुलींच्या यशात मला भविष्यातल्या विकसित भारताची झलक दिसते आहे. मी प्रत्येक माता-पित्यांना विनंती करतो की अशा होतकरु मुलींच्या कुटुंबांकडून काही शिकत, आपापल्या मुलींनाही प्रगतीच्या वाटा खुल्या कराव्या, असंही त्यांनी म्हटलं.