(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Independence Day 2021: भारतीय स्वातंत्र्य पंचाहत्तरीत; जाणून घ्या या दिवसाचे महत्व
Independence day 2021 : अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणांची आहूती देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं एक आगळं-वेगळं महत्व आहे.
नवी दिल्ली : आपल्या देशात 15 ऑगस्ट हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. ब्रिटिशांनी जवळपास 150 वर्षे भारतावर राज्य केलं. मोठ्या लढ्यानंतर भारतीयांना 15 ॲागस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं. या वर्षी आपण स्वातंत्र्यदिनाची 75 वर्षे साजरी करणार आहोत. भारतीय स्वातंत्र्य सैनिकांनी आपले प्राण पणाला लावून देशासाठी बलिदान दिले, त्यामुळे या दिवसाचे महत्व वेगळंच आहे.
महात्मा गांधी, भगत सिंह, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. राजेंद्र प्रसाद, मौलाना अब्दुल कलाम आजाद, सुखदेव, गोपाळ कृष्ण गोखले, लाला लजपत राय, लोकमान्य टिळक, चंद्रशेखर आजाद, खुदीराम बोस यांसोबतच अनेक शूरवीर भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अहोरात्र झटले. त्यामुळे आज आपण भारत भूमीवर आपले अस्तित्व निर्माण करू शकलो.
स्वातंत्र्य दिवस कार्यक्रम कसा असणार?
दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला 2021च्या टोकीयो ॲालिम्पिकमध्ये ज्या ज्या खेळांडूंनी भारताला पदकं मिळवून दिली त्यांना या कार्यक्रमाचे खास आमंत्रण असणार आहे.
अनेक राष्ट्रभक्ताच्या बलिदानातून भारताला 15 ॲागस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी त्यावेळी लाल किल्ल्यावर पहिल्यांदा तिरंगा फडकवला.
स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व
स्वातंत्र्यदिन साजरा करताना आपल्याला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेल्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण आणि त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्याची संधी असते. गा दिवस आपण साजरा करताना त्यामागे असंख्य लोकांनी आपल्या प्राणाची आहूती दिली आहे याची जाणीव आपल्याला असायला हवी. त्यांच्या या कामगिरीला देशभरातून आदरांजली वाहिली जाते. शाळा -महाविद्यालयांमध्ये या दिवशी विशेष कार्यक्रम सादर करण्यात येतात.
कोरानाच्या सर्व नियमांचे पालन करुन आपण या वर्षीचा स्वातंत्र्यदिन साजरा करावा असं आवाहन केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीनं करण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या :
- Independence Day : भारताच्या स्वातंत्र्यासाठी 15 ऑगस्ट हाच दिवस का निवडला? काय आहे त्यामागचे ऐतिहासिक कारण?
- Independence Day : लाल किल्ल्याच्या सुरक्षेसाठी 'कंटेनरची भिंत'; 'राष्ट्र प्रथम-सदैव प्रथम' चा संदेशही देणार
- Independence Day : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी मुंबईत सुरक्षाव्यवस्था तगडी, मुंबई पोलिसांचं मिशन ऑलआऊट